Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनाली कुलकर्णीचा दाक्षिणात्य सिनेमातील फर्स्ट लूक समोर, अभिनेत्री म्हणते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 13:25 IST

मराठी सिनेसृष्टीच्या या अप्सरेची बिग बजेट दाक्षिणात्य सिनेमात वर्णी लागली आहे. या सिनेमातील तिचा फर्स्ट लूक समोर आला आहे. 

मराठी सिनेसृष्टीची अप्सरा अशी ओळख मिळवलेली अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.  'बकुळा नामदेव घोटाळे' या सिनेमामुळे सोनालीला लोकप्रियता मिळाली. त्यानंतर 'गाढवाचं लग्न', 'क्षणभर विश्रांती', 'नटरंग', 'अजिंठा', 'मितवा', 'पोश्टर गर्ल', 'हिरकणी' अशा सुपरहिट सिनेमांतून प्रेक्षकांची मनं जिंकणारी सोनाली दाक्षिणात्य सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी सिनेसृष्टीच्या या अप्सरेची बिग बजेट दाक्षिणात्य सिनेमात वर्णी लागली आहे. नुकताच या सिनेमातील तिचा फर्स्ट लूक समोर आला आहे. 

सोनाली कुलकर्णी 'मलैकोटै वालिवन' या दाक्षिणात्य सिनेमात झळकणार आहे. या चित्रपटात सोनाली महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. आता या सिनेमातील सोनालीचा लूक समोर आला आहे. सोनालीने या सिनेमातील शूटिंगदरम्यानचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. यातील पहिल्याच फोटोमध्ये सोनालीची झलक पाहायला मिळत आहे. हे फोटो शेअर करत सोनालीने "आम्ही ड्रामा म्हणालो का?" असं कॅप्शन दिलं आहे. 

काही दिवसांपूर्वीच 'मलैकोटै वालिवन' या दाक्षिणात्य सिनेमाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला होता. हा सिनेमा लिजो पेलिसरी यांनी दिग्दर्शित केला आहे. या सिनेमात सोनाली दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. येत्या २५ जानेवारीला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :सोनाली कुलकर्णीTollywoodसेलिब्रिटीसिनेमा