सध्याच्या युगात सोशल मीडियावर सक्रिय राहण्याचं वेड तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहे. इन्स्टावरील फॉलोअर्स ही क्रेझ इतकी वाढलीय ज्यामुळे एका प्रसिद्ध कंटेट क्रिएटरनं २४ व्या वर्षी टोकाचं पाऊल उचलले आहे. मिशा अग्रवाल असं या सोशल मिडिया इन्फ्लुएंसरचं नाव असून तिने २५ वा वाढदिवस साजरा करण्याच्या २ दिवस आधीच जगाचा निरोप घेतला आहे. मिशा अग्रवाल ही कायम इन्स्टावर सक्रीय होती. त्यात वेगवेगळे व्हिडिओ बनवून ती अपलोड करायची परंतु मागील काही दिवसांपासून तिच्या व्हिडिओला व्ह्यूज कमी मिळत होते, फॉलोअर्सही कमी होत चालले होते त्यामुळे तिला नैराश्य आले. यातून मिशाने आत्महत्या केली आहे.
मिशाची बहीण म्हणाली की, मिशा तिच्या करिअरला घेऊन खूप चिंतेत होती. तिचं करिअर संपेल अशी भीती तिला वाटायची. त्यातून तिने हा धक्कादायक निर्णय घेतला. मिशाने तिचे आयुष्य इन्स्टावर घालवले, तिला १ मिलियन फॉलोअर्स करायचे होते. तिने इन्स्टालाच तिचे जग बनवून टाकले परंतु जेव्हा फॉलोअर्स कमी होत राहिले तेव्हा तिला नैराश्य आले. मी काहीच करू शकत नाही असं तिला तिचं मन खात होते. एप्रिलच्या सुरुवातीपासूनच ती खूप दुःखी होती आणि मला मिठी मारून रडत असे आणि म्हणत असे, 'माझे फॉलोअर्स कमी झाले तर?' माझं करिअर संपेल असं बहिणीने सांगितले.
कुटुंबाने मिशाला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. इन्स्टाग्राम हा जीवनाचा भाग आहे परंतु ते सर्व काही नाही. एलएलबीचं शिक्षण घेतलेल्या मिशा अग्रवालने सोशल मीडियालाच तिचे जग बनवले. दुर्दैवाने माझ्या बहिणीने आमचं ऐकलं नाही. इन्स्टावरील फॉलोअर्स कमी होण्याच्या चिंतेत ती इतकी निराश झाली की तिने कायमचं हे जग सोडले. मिशानं उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे असं मिशाच्या बहिणीनं म्हटलं.
दरम्यान, मिशा अग्रवालने २४ एप्रिलला जगाचा निरोप घेतला. २६ एप्रिलला तिच्या वाढदिवशी कुटुंबाने मिशाच्या निधनाची बातमी दिली. परंतु मिशाचं अचानक निधन कसं झालं हा प्रश्न फॉलोअर्सला पडला होता. त्यावर मिशाच्या बहिणीने एक पोस्ट करत नैराश्य येऊन मिशाने तिचे आयुष्य संपवल्याची माहिती दिली. मिशाच्या मित्रांनीही तिला कसली तरी भीती वाटत होती. आम्ही अनेकदा तिच्याशी बोललो, तिचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला परंतु आता ती सोडून गेली असं सांगितले.