'बिग बॉस मराठी २'चा विजेता शिव ठाकरेचा (Shiv Thakare) मोठा चाहतावर्ग आहे. त्याच्या मनमोकळ्या स्वभावामुळे तो सर्वांना आपलासाच वाटतो. 'अमरावतीचा वाघ' अशी ओळख असलेला शिव ठाकरे लहान मुलांचाही लाडका आहे. अनेकदा तो रस्त्यावरील छोट्या मुलांसोबत मस्ती करतो, त्यांच्याशी गप्पा मारतो. याचे व्हिडिओ त्याने शेअर केले आहेत. शिवला अनेकदा त्याच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला जातो. आता एका शाळकरी मुलीनेच त्याला लग्न कधी करणार असं विचारलं. त्यावर त्याने दिलेलं उत्तर चर्चेत आहे.
शिव ठाकरे त्याच्या उदार स्वभावासाठी ओळखला जातो. तो गरीबांना मदतही करतो. कारमधून जात असताना तो अनेकदा लहान मुलांनाही लिफ्ट देतो. नुकताच त्याने एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये तो कार चालवत आहे तर मागे शाळकरी मुलगी बसली आहे. आणि बाजूच्या सीटवर एक चिमुकला बसला आहे. शिव म्हणतो, 'आजकाल लग्न केल्यानंतर मुली सोडून जातात. म्हणून मी लग्न करायला घाबरत आहे.' यावर ती मुलगी म्हणते, 'असं कसं तुम्हाला कोणी सोडून जाईल. मुलगी तुमच्यासारखीच चांगली असेल तर ती तुम्हाला सोडून जाणार नाही.' तेव्हा शिव म्हणतो, "अरे आजकाल हेच घडत आहे. मुली सोडून देत आहेत. आता काळ बदलला आहे. आता मुलगी सोडून जाते आणि सगळं घेऊनही जाते. मग तुम्ही काय करणार? म्हणून मला भीती वाटते. आता मी संन्यासच घेणार आहे." मराठी सेलिब्रिटी कट्टाने हा व्हिडिओ शेअर केला आहे.
शिवचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. आजकालच्या घटना बघता त्याचा लग्नावरचा विश्वासच उडालेला दिसतोय. शिवने बिग बॉसनंतर अनेक रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला. बिग बॉस हिंदी मध्येही तो झळकला. तिथे तो रनर अप होता.'खतरो के खिलाडी','रोडीज' मध्येही तो होता. बिग बॉस मराठीमध्ये असताना त्याचं वीणा जगतापसोबत अफेअर गाजलं. मात्र त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. मधल्या काळात त्याचं डेजी शाहसोबत नाव जोडलं गेलं होतं.