Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुपरस्टार्सने शत्रुघ्न सिन्हांकडे फिरवली होती पाठ; 'या' एका कारणामुळे त्यांच्यासोबत करत नव्हते काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 11:46 IST

Shatrughan sinha: 'या' एका गोष्टीमुळे सुपरस्टार करत नव्हते शत्रुघ्न सिन्हासोबत काम; बऱ्याच वर्षांनी केला खुलासा

दमदार अभिनयशैली आणि भारदस्त आवाज यांच्या जोरावर इंडस्ट्री गाजवणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे शत्रुघ्न सिन्हा ( Shatrughan sinha). करिअरच्या सुरुवातीला नकारात्मक भूमिका साकारुन त्यांनी लोकप्रियता मिळवली. विशेष म्हणजे त्यांचे निगेटिव्ह रोल सुद्धा पडद्यावर चांगलेच गाजत होते. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढत होती. परिणामी, त्याकाळात अनेक 'हिरो' असुरक्षित झाले होते, असा खुलासा त्यांनी स्वत:ला केला. 

अलिकडेच शत्रुघ्न सिन्हा यांनी ‘झूम’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या फिल्मी करिअरवर भाष्य केलं. नकारात्मक भूमिका गाजत असताना त्यांनी अचानकपणे त्या भूमिका सोडून हिरोचे रोल करायला सुरुवात केली. त्यांच्या या निर्णयाला त्यांच्या पत्नीने आणि सेक्रेटरीने चांगलाच विरोध केला होता.

"केवळ माझी सेक्रेटरीच नाही तर माझी बायको सुद्धा एकच विचारत होती की, तू का सोडतोयेस? खलनायकांची खूप क्रेझ आहे. पण, ही वेळ ती भूमिका सोडण्याची आहे हे मी त्यांना कसं समजावलं असतं? कारण, लोक माझ्यासाठी टाळ्या वाजवत होते. मला पाठिंबा देत होते. मला पुढे जाण्यासाठी ते प्रोत्साहन देत होते. मात्र, त्यावेळी आघाडीचे हिरो माझ्यासोबत काम करायला तयार नव्हते. ते कायम माझ्यासोबत काम न करण्यासाठी कारणं शोधयचे. त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती", असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "हा सीनमध्ये भाव खाऊन जातो. आणि, पडद्यावर वर्चस्व निर्माण करतो. तुम्हाला हिरो हवाय की खलनायकाचं वर्चस्व असलेला हिरो हवाय? असं ते म्हणायचे. पण, माझ्या तोंडावर बोलण्याचं धाडस त्यांनी कधीच केलं नाही. ते माझ्या पाठीमागे माझ्या विरोधात बोलायचे.  त्यावेळी मी उशीरा सेटवर पोहोचल्यावर हिरो म्हणायचे की, तो उशीरा येतो. पण, अरे मी उशीरा येत असलो तरी तुमच्या बापाचं काय जातं? जे काम पूर्ण करण्यासाठी तुम्ही १० तास लावता. तेच काम करायला मी ३ तासात पूर्ण करतो. मी वन-टेक कलाकार होतो. त्यामुळे सगळे माझ्या कामावर खुश असायचे."

दरम्यान, शत्रूघ्न सिन्हा यांनी आता कलाविश्वात पूर्वीसारखे सक्रीय नसतात. त्यांचा वावर आता कमी झाला आहे. मात्र, त्यांचा हा वारसा त्यांची लेक सोनाक्षी सिन्हा पुढे नेत आहे. दबंग या सिनेमातून सोनाक्षीने कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर अनेक गाजलेल्या सिनेमात ती झळकली आहे.

टॅग्स :शत्रुघ्न सिन्हाबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमासोनाक्षी सिन्हा