Join us
Daily Top 2Weekly Top 5

"पिक्चर मे मत आना यार..." शाहिद कपूरचा मुलांना सल्ला; म्हणाला, "या क्षेत्रात खूपच..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 09:39 IST

शाहिद कपूर आगामी 'देवा' सिनेमात दमदार भूमिकेत दिसणार आहे.

अभिनेता शाहिद कपूरने (Shahid Kapoor) त्याच्या करिअरमध्ये अनेक दर्जेदार सिनेमे दिले आहेत. 'इश्क विश्क','दिल माँगे मोर','विवाह' या सिनेमांमधून त्याने 'चॉकलेट बॉय' अशी छाप पाडली. तर गेल्या काही वर्षात 'कमिने','हैदर' अशा सिनेमांमधून रफ अँड टफ भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. त्याचा आगामी 'देवा' सिनेमा येतोय ज्याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. दरम्यान शाहिदीला एक मुलगा आणि एक मुलगीही आहे. आपल्या मुलांनी अभिनय क्षेत्रात येऊ नये असं त्याने नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं.

आपल्या मुलांमध्ये कोणते गुण असावेत याबद्दल राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये शाहिद कपूर म्हणाला, "नेहमी चांगलं काम करा आणि मी कायम चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत असतो. मग ते मला आवडो या ना आवडो, किंवा कोणालाही आवडो या ना आवडो, माझ्यासाठी नुकसानीचं असो नसो, मला यामुळे काही फरक पडत नाही. मी चांगलंच काम करेन. पण अशा अनेक गोष्टी आहेत ज्या माझ्या मुलांनी माझ्याकडून घेऊ नये. त्यांनी स्वाभाविक आत्मविश्वासू असावं, जे मला वाटतं ते दोघंही आहेत. मी जन्मत: इतका आत्मविश्वासू नव्हतो. मी कायम त्यांच्याबद्दल असंच म्हणतो की 'पिक्चरमध्ये नका येऊ यार, काहीतरी वेगळं करा. इथे खूप चढ उतार आहेत. खूप कठीण आहे. जर त्यांना अभिनय करायचा असेल तर ती त्यांची आवड आहे. पण मी त्यांना काहीतरी साधं सरळ निवडायला सांगेन. कारण हे खूप अवघड आहे."

शाहिद कपूर 'देवा' सिनेमात देव अंबरेची भूमिका साकारत आहे. याचा अनुभव सांगताना तो म्हणाला, "देवा माझ्यासाठी माझ्या काळजाचा तुकडाच आहे. मी एक मासी फिल्म करावी असं अनेक लोक मला गेल्या काही वर्षांपासून म्हणत होते. असं काहीतरी जे चाहत्यांसोबत, जनतेसोबत जोडणारं असेल. माझ्यासाठी हे माझ्या प्रवासातील पुढचं पाऊल आहे. ही माझ्या करिअरमधील सर्वात आव्हानात्मक फिल्म आहे. देव या भूमिकेत इतकं काही आहे जे मी सध्या सांगू शकत नाही. यासाठी तुम्हाला थिएटरमध्येच यावं लागेल." 

 

टॅग्स :शाहिद कपूरबॉलिवूडपरिवार