Join us
Daily Top 2Weekly Top 5

सतीश कौशिक यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीत शोककळा, सेलिब्रिटींनी ट्वीट करत व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 09:48 IST

अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी आज ६६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Satish Kaushik : अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी आज ६६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. त्यांचे जवळचे मित्र अभिनेते अनुपम खेर यांनी पोस्ट शेअर करत माहिती दिली. सतीश कौशिक यांच्या अचानक जाण्याने मनोरंजनविश्वात शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सर्वांना खळखळून हसवणारे सतीश कौशिक आज आपल्यात नाहीत यावर कोणाचाही विश्वास बसत नाहीए. त्यांचे अगदी जवळचे मित्र अनुपम खेर यांनी भावूक पोस्ट शेअर करत लिहिले, 'मला माहितीए, मृत्यू हे अंतिम सत्य आहे. पण मी जीवंत असताना माझ्या जीवलग मित्राबाबत मी हे लिहेन असं वाटलं नव्हतं. ४५ वर्षांच्या मैत्रीला असा अचानक पूर्णविराम लागला. तुझ्याशिवाय आयुष्य पूर्वीसारखं नक्कीच नसेल. ओम शांती!'

गायक कैलाश खेर यांनीही सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहताना लिहिले, 'आणखी एक उत्कृष्ट तारा नाहीसा झाला. सतीश कौशिक आता आपल्यात नाहीत. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो. खूप उत्तम कलाकार होते.काही दिवसांपूर्वीच त्यांनी मुंबई विमानतळावर भेट झाली होती.'

अभिनेत्री कंगना राणौत हिनेही सतीश कौशिक यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. तिने पोस्ट शेअर करत लिहिले, 'अतिशय वाईट बातमीने दिवसाची सुरुवात झाली. ते माझे सर्वात मोठे चीअरलीडर होते. यशस्वी अभिनेते आणि  दिग्दर्शक होते. व्यक्तिश: ते खूपच दयाळू आणि खरे होते. त्यांच्यासोबत इमर्जन्सी सिनेमात काम करायला मजा आली. ते नेहमीच स्मरणात राहतील.'

सतीश कौशिक यांनी दिल्लीतील गुरुग्रामच्या फोर्टिस रुग्णालयात आज अखेरचा श्वास घेतला. शवविच्छेदनानंतर त्यांचे पार्थिव संध्याकाळपर्यंत मुंबईत आणण्याची शक्यता आहे.

टॅग्स :सतीश कौशिकसिनेमामृत्यूसेलिब्रिटी