विजय तेंडुलकर लिखित 'घाशीराम कोतवाल' (Ghasiram Kotwal) हे कालातीत मराठी नाटक आता हिंदीत येत आहे. दिग्दर्शक अभिजीत पानसे आणि भालचंद्र कुबल यांनी याची जबाबदारी घेतली आहे. आकांक्षा माळी आणि अनिता पलांडे यांनी नाटकाची निर्मिती केली आहे. नाटकात नाना फडणवीस यांची भूमिका हिंदीतील विनोदी, ज्येष्ठ अभिनेते संजय मिश्रा साकारणार आहेत. तर संतोष जुवेकर घाशीराम कोतवालच्या भूमिकेत असणार आहे. संजय मिश्रा अनेक वर्षांनी रंगभूमीवर पुनरागमन करत आहेत. एनएसडीमध्ये शिक्षण घेतलेले संजय मिश्रा उत्कृष्ट अभिनेते आहेत ज्याची झलक आपण सिनेमांमधून बघितलीच आहे. आता त्यांना लाईव्ह रंगभूमीवर पाहण्यास मजा येणार आहे. नाटकानिमित्त संजय मिश्रा (Sanjay Mishra) यांच्याशी 'लोकमत फिल्मी'ने साधलेला संवाद
'घाशीराम कोतवाल'नाटकाबद्दल तुम्ही पहिल्यांदा कधी ऐकलं होतं?
३० वर्षांनंतर मी नाटक करणार आहे. एनएसडी मध्ये असताना मी हे नाटक वाचलं होतं. जर त्या वेळी मला ही भूमिका कोणी ऑफर केली असती तर मी 'नाही' म्हणत एक महिन्यासाठी गायब झालो असतो. कारण या भूमिकेसाठी खूप मोठा अनुभव गाठीशी असला पाहिजे. मी हे नाटक जेव्हा वाचलं तेव्हा मला कळलं की नाना फडणवीस कसे आहेत. हे खूप रिअल लाईफ कॅरेक्टर आहे. मला सादर करतानाही तेच भाव आणायचे आहेत.
नवीन पिढीतील प्रेक्षकांना हे नाटक समजावं म्हणून काही प्रयत्न केले आहेत का?
घाशीराम कोतवाल भारतातलं एक मोठं नाटक आहे. सध्याच्या पिढीतील प्रेक्षकांना नाटक समजावं म्हणून आम्ही थोडा बदल केला आहे. मी जे करतोय ते घरी माझ्या मुलांना समजतंय का हे मी आधी पाहिलं. समजायला साधं सोपं करण्याचा आम्ही प्रयत्न केला.
या भूमिकेसाठी तयारी करताना कोणाकोणाशी चर्चा केली?
माझा संपूर्ण ग्रुप मराठी आहे. मी सर्वांशी चर्चा केली. ते जे जे सांगत आहेत ते सगळं आत्मसात केलं. कारण हे मला भूमिका करताना कामी येणार होतं. आमचे दिग्दर्शक भालचंद्र कुबल यांना मी नेहमी तालीम झाल्यानंतर विचारायचो, की मी जे करतोय त्यात मी कुठे मर्यादा तर ओलांडत नाही ना? मी खूप वास्तववादी अभिनेता आहे. पण नाना फडणवीस यांच्यासारखा मी कोणी खऱ्या आयुष्यात बघितलाच नाही. मोहन आगाशेजींना मी अजून भेटलो नाही. मला तर भीतीच वाटते. हे एक क्लासिक नाटक आहे. त्यात जर काही छेडछाड केली तर त्याची मजाच निघून जाईल.
घाशीरामच्या भूमिकेतील संतोष जुवेकरसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
संतोष वा...संतोष आणि अभिजीत पानसे मला गुरुजी गुरुजी म्हणतात. आमची पहिली भेट मला आठवते. नाना साहाब...नाना साहाब..असं अचानक माझ्या कानावर आलं. मग कळलं की घाशीराम कोतवाल नाटक हिंदीत करायचं आहे. संतोष या नाटकात घाशीराम आहे. आणि मला नाना फडणवीसची ऑफर आहे. मी नाटकाचं नाव ऐकताच होकार दिला. तसंच अभिजीत पानसे यांचा 'ठाकरे' सिनेमा माझा आवडता आहे. चलो यार..,पहले रोल पकड लेते है असंच माझ्या मनात आलं आणि मी होकार दिला.
मराठी नाटक पाहता का? त्याबद्दल काय वाटतं
हो मी मराठी नाटक अधूनमधून पाहत असतो. गुजरातीही पाहतो. मराठी रसिक प्रेक्षकांचं मला खूप कौतुक वाटतं. त्यांनी नाटक ही संस्कृती जिवंत ठेवली आहे. ही संस्कृती अशीच अबाधित राहिली पाहिजे. मराठी प्रेक्षकांना माझा खरोखर सलाम.
'घासीराम कोतवाल' नाटकाला कुठपर्यंत घेऊन जाणार?
घासीराम कोतवाल या नाटकासाठी मी कुठेही जायला तयार आहे. मला रेकॉर्ड्स गोळा करण्याची आवड आहे. माझ्याजवळ बालगंधर्व, भीमसेन जोशी, कुमरा गंधर्व यांचे रेकॉर्ड्स आहेत. मला ही गोष्ट जर आवडते तर मी युपी, बिहार ते लंडनपर्यंत का घेऊन जाणार नाही? तसंच मला हे नाटक प्रत्येक ठिकाणी घेऊन जायचं आहे. नाटकातून एक संस्कृती दिसते आणि ती दूरपर्यंत पोहोचली पाहिजे.