'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा टेलिव्हिजनवरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. घराघरात हा कार्यक्रम पाहिला जातो. या शोचे लाखो चाहते आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मुळे अनेक लोकांचे जीव आत्महत्या करण्यापासून बचावले, असा खुलासा नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हास्यसम्राट समीर चौघुलेंनी केला आहे. तर सीमेवरील आर्मीचे जवानही हास्यजत्रा पाहत असल्याचं समीर चौघुले म्हणाले.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुले आणि ईशा डे यांनी नुकतीच अजब गजबला मुलाखत दिली. या समीर चौघुले म्हणाले, "महाराष्ट्राची हास्यजत्रामुळे अनेकांच्या आत्महत्या थांबल्या. माझ्याकडे अशी पत्र आहेत ज्यात लिहिलंय की मी आत्महत्या करायला जाणार होतो. पण, तुमचं स्किट पाहिलं आणि मी निर्णय बदलला. ही केवढी गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे. इंडियन आर्मीतील अनेक लेफ्टनंट आमच्या सेटवर येऊन गेले होते. ते म्हणाले की आमची मराठा बटालियन तुमची फॅन आहे. लेह-लडाखला थंडीत असताना आम्ही तुमचे स्किट बघतो आणि हसतो. हा किती मोठा आशीर्वाद आहे. ज्यांना मी देवाच्या पुढे मानतो त्यांना मी आनंद देतोय. आज ते देशाचं रक्षण करत्यात. माझ्यासाठी ते एखाद्या देवाच्याही पुढे आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर मी हास्य आणतो. हा माझ्यासाठी देवाने दिलेला आशीर्वाद आहे"
समीर चौघुले आणि ईशा डे हे 'गुलकंद' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या सिनेमात सई ताम्हणकर आणि प्रसाद ओकदेखील झळकले आहेत. येत्या १ मे रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन सचिन गोस्वामी यांनी केलं असून लेखक सचिन मोटे आहेत.