Join us

"छावा चित्रपट छानच आहे, पण.."; मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड काय म्हणाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 13:23 IST

संभाजी मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारुन लोकप्रिय झालेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने छावा सिनेमा पाहून तिचं मत व्यक्त केलंय. काय म्हणाली प्राजक्ता?

'छावा' सिनेमा १४ फेब्रुवारी २०२५ ला रिलीज झाला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. याशिवाय प्रेक्षकांचंही कौतुक मिळवलं. 'छावा' सिनेमा पाहून काहींनी नाराजीही व्यक्त केली. अशातच टीव्हीवरील गाजलेल्या 'संभाजी' मालिकेत महाराणी येसूबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने 'छावा' सिनेमाबद्दल तिची प्रतिक्रिया दिली. काय म्हणाली प्राजक्ता? जाणून घ्या

प्राजक्ता गायकवाड 'छावा'बद्दल काय म्हणाली?

सकाळला दिलेल्या मुलाखतीत प्राजक्ता छावाबद्दल म्हणाली की, "खरं सांगू तर, शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने छावा चित्रपट मी उशीरा पाहिला. पण तोपर्यंत प्रेक्षकांच्या इतक्या कमेंट्स, इतके फोन आणि मेसेजेस येत होते की, महाराणी येसूराणी बाईसाहेब म्हणून अजून तुम्हीच आम्हाला हव्याहव्याश्या वाटता. कारण काय माहित नाही, पण ती भूमिका अजूनही लोकांच्या मनात घर करुन आहे. लोकांना अजूनही ती भूमिका आठवते आणि अजूनही लोक मला त्या भूमिकेत बघतात. त्यामुळे एक कलाकार म्हणून खूप छान वाटतं की ती भूमिका आपण जरी साकारली, ती संपली तरी प्रेक्षकांच्या मनात अजूनही घर करुन आहे." 

"मी छावा चित्रपट पाहिला. छान आहे आणि सगळ्यांनी कामही खूप छान केलंय पण मराठी म्हटल्यानंतर, आपण किंवा आपले कलाकार छान करु शकले असते असं कुठेतरी वाटलं. मला असं वाटतं की, हे माझं मत नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं मत आहे की, ती आपली संस्कृती आणि आपला इतिहास आहे. तो जर बघताना आपले लोक असले असते तर छान वाटलं असतं."

"कारण तो एक मराठीपणा, मराठी साज या सगळ्या गोष्टी आपल्या अंगभूत असतात. ते आपल्याला क्रिएट करायची गरज पडत नाही. त्यामुळे ते छान वाटलं असतं. पण मी एवढं नक्की सांगेन की, महाराणी येसूराणीसाहेबांच्या जीवनपटावर काही चित्रपट, काही मालिका कोणी करत असेल तर मला पुन्हा एकदा ते पात्र साकारायला नक्की आवडेल." अशाप्रकारे प्राजक्ताने तिचं मत व्यक्त केलं.  

टॅग्स :प्राजक्ता गायकवाड'छावा' चित्रपटरश्मिका मंदानाविकी कौशल