Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सॅम बहादूर'वर 'अ‍ॅनिमल' भारी; 4 दिवसात बॉक्स ऑफिसवर केली दमदार कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 09:01 IST

Box office collection day 4: पहिल्या दिवशी या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. मात्र, आता 'अ‍ॅनिमल'ने 'सॅम बहादूर' या सिनेमाला पिछाडीवर टाकलं आहे.

बॉलिवूडमध्ये एका पाठोपाठ एक अशा अनेक दर्जेदार सिनेमांची निर्मिती होत आहे. यामध्येच 1 डिसेंबरला रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' आणि विकी कौशलचा 'सॅम बहादूर' हे दोन्ही सिनेमा रिलीज झाले. विशेष म्हणजे एकाच दिवशी रिलीज झालेल्या या दोन्ही सिनेमांनी पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. मात्र, आता रिलीजच्या चौथ्या दिवशी 'अ‍ॅनिमल'ने सॅम बहादूरला कमाईच्या बाबतीत मागे टाकलं आहे. 

सॅम बहादूर हा सिनेमा 1971 मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. या युद्धात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. या युद्धात पहिले फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांनी जबरदस्त कामगिरी केली होती. त्यामुळे सॅम मानेकशॉ यांच्या जीवनावर आणि 1971 वर आधारित 'सॅम बहादूर' हा सिनेमा आहे. तर, दुसरीकडे त्याच्यासोबत 'अ‍ॅनिमल' हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमात रणबीर कपूरसह अनिल कपूर, बॉबी देओल आणि रश्मिका मंदाना यांची मुख्य भूमिका आहे.

पहिल्या दिवशी या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. मात्र, आता 'अ‍ॅनिमल'ने 'सॅम बहादूर' या सिनेमाला पिछाडीवर टाकलं आहे. चौथ्या दिवशी अ‍ॅनिमल'ने कमाईचा उच्चांक गाठला आहे. 'सॅम बहादूर' या सिनेमाने पहिल्या दिवशी 6.25 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर, रविवारी या सिनेमाने 10.3 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. त्यानंतर सोमवारी या सिनेमाच्या कमाईचे आकडे घसरले या सिनेमाने फक्त 3.50 कोटींची कमाई केली. त्याच्या तुलनेत 'अ‍ॅनिमल'ने चौथ्या दिवशी तब्बल 40 कोटींची कमाई केली. त्यामुळे 55 कोटी रुपयांचा खर्च करुन तयार झालेल्या 'सॅम बहादूर' या सिनेमाने चार दिवसात केवळ 29.05 कोटी रुपये इतकीच कमाई केली आहे.

सॅम बहादूरचं वर्ल्ड वाइल्ड कलेक्शनचा विचार केला तर या सिनेमाने 3 दिवसात 35.50 कोटींची कमाई केली. भारतात या सिनेमाने 3 दिवसात 30.15 कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे या सिनेमाची वर्ल्डवाइल्ड कमाई फक्त 40 कोटी रुपये इतकीच झाली आहे.

टॅग्स :बॉलिवूडसिनेमाविकी कौशलरणबीर कपूरअनिल कपूरबॉबी देओलरश्मिका मंदाना