Salman Khan Death Threat: सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. सलमानला धमकीचा संदेश पाठवणारा तरुण हा फक्त २६ वर्षांचा असल्याचं समोर आलं आहे. १४ एप्रिल रोजी वडोदरा जवळील एका गावातून तरुणाने मुंबईतील वरळी भागात असलेल्या परिवहन विभागाच्या अधिकृत व्हॉट्सअप नंबरवर एक संदेश पाठवला होता. ज्यामध्ये सलमान खानला त्याच्या घरात घुसून मारले जाईल आणि त्याची कार बॉम्बने उडवली जाईल, अशी धमकी दिली होती. घटनेबाबत अधिक तपास सुरू असून आरोपीबद्दल धक्कादायक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
सलमानला जीवे मारण्याची धमकी देणारा तरुण मानसिक आजारी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील वाघोडिया या गावाचा तो रहिवासी आहे. मयंक पांड्या असं आरोपीचं नाव असल्याचं तपासात समोर आलं आहे. त्याचे पालक ज्यूसचे दुकान चालवतात.समोर आलेल्या माहितीनुसार आरोपीच्या आजोबांचा त्याच्या डोळ्यासमोर (विद्युत शॉकमुळे) मृत्यू झाला आणि तो धक्का सहन करू शकला नव्हता. तेव्हापासून तो मानसिक उपचार घेत आहे. सलमान खानला पाठवलेल्या धमकीबद्दल आरोपीच्या कुटुंबाला कोणतीही कल्पना नव्हती.
द फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार, ओरापी हा लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीकडून खानला वारंवार मिळणाऱ्या धमक्यांमुळे प्रभावित झाला होता. इंस्टाग्राम फॉलोअर्स वाढवण्याठी त्यानं स्वतःही अशाच प्रकारच्या धमक्या पाठवण्याचा निर्णय घेतला. गुगल सर्चवरून मुंबई ट्रॅफिक पोलिसांचा व्हॉट्सअॅप हेल्पलाइन नंबर सापडला आणि त्याने सलमानला जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज पाठवला.
दरम्यान, यापूर्वीही सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून अनेक वेळा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. गेल्या वर्षी १४ एप्रिल २०२४ रोजी पहाटे ५ वाजता सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गोळीबार झाला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुचाकीस्वार घटनास्थळावरून पळून जाताना दिसले होते. १९९८ च्या काळवीट शिकार प्रकरणावरून बिश्नोई गँग सलमानच्या मागे लागली आहे. गेल्यावर्षी सलमानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर त्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे आणि त्याला वाय प्लस श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे.