बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) घरातच एका अज्ञाताने रात्री २ च्या सुमारास हल्ला केला. चोरीच्या उद्देशाने आलेल्या व्यक्तीला आधी मोकरणीने पाहिलं. तिने आरडाओरडा केल्याने सैफ धावत आला. तेव्हा त्यांच्यात हातापाई झाली आणि चोराने सैफवर ६ वेळा वार केले. यानंतर तो पळून गेला तर सैफला तातडीने ड्रायव्हरने लीलावती रुग्णालयात आणले. सध्या सैफवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली असून तो आता धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. नुकतंच सैफची बहीण सोहा अली खान (Soha Ali Khan) हॉस्पिटलमधून बाहेर येताना दिसली. रडून रडून थकलेला तिचा चेहरा व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येत आहे.
सैफ अली खान सध्या लीलावती रुग्णालयात आहे. रात्रीतूनच त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. त्याच्या पाठीच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या शरिरातून अडीच इंचाचा चाकूचा तुकडा काढण्यात आला. आता तो धोक्याबाहेर आहे. तसंच त्याच्या मानेवरही वार करण्यात आल्याने तो चांगलाच जखमी झाला आहे. सैफवर हल्ला झाल्यानंतर रात्रीच करीनाही घरी आली. आज लीलावती रुग्णालयात करीना, सैफची मुलं सारा आणि इब्राहिम हे दाखल झालेले दिसले. तर आता नुकतंच सैफच्या बहिणीचा व्हिडिओ समोर आला आहे. सोहा अली खान भाऊ सैफची भेट घेऊन रुग्णालयाबाहेर आली. कारमध्ये बसत असतानाचा तिचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये तिची रडून रडून वाईट अवस्था झाली आहे. तिचा पडलेला चेहरा स्पष्ट दिसून येतोय. सैफ थोडक्यात बचावला असून आता काळजीचं कारण नाही असं डॉक्टर म्हणालेत. त्याच्या तब्येतीसाठी चाहते प्रार्थना करत आहेत.
काय म्हणाले डॉक्टर?
रात्री २ वाजताच्या सुमारास सैफ अली खान यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. चाकूच्या तुकड्यामुळे त्यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. हा तुकडा बाहेर काढण्यासाठी सर्जरी करावी लागली. त्यांच्या डाव्या हाताला दोन गंभीर जखमा झाल्या होत्या. त्यांच्या मानेवरही जखम झाली होती. त्यासाठी प्लास्टिक सर्जरी करावी लागली.