Saif Ali Khan News: अभिनेता सैफ अली खान याच्यावर घरात घुसून हल्लेखोराने चाकूने वार केले होते. चाकूचा तुकडाच पाठीत अडकल्याने सैफ अली खान गंभीर जखमी झाला होता. या हल्ल्यानंतर सैफ अली खानच्या घराच्या परिसरात सीसीटीव्ही नसल्याचे समोर आले. या हल्ल्याच्या घटनेनंतर सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
१६ जानेवारी रोजी रात्री २ दोन वाजता सैफ अली खानच्या डुप्लेक्स फ्लॅटमधील ११व्या मजल्यावर घटना घडली होती. आरोपी घरात घुसला आणि पैशाची मागणी केली. आरडाओरडा झाल्यानंतर सैफ अली खान धावत आला. त्याचवेळी हल्लेखोराने सैफवर चाकूने हल्ला केला होता.
आरोपी घराच्या परिसरात कसा आला, याची माहिती पोलिसांना कळू शकली नाही, कारण सैफ अली खानच्या घराच्या परिसरात सीसीटीव्ही लावण्यात आलेले नव्हते. या हल्यानंतर आता सैफ अली खानच्या घराच्या परिसरात सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत.
बांगलादेशचा आरोपी, ठाण्यातून केली अटक
सैफ अली खानवर १६ जानेवारी रोजी हल्ला केल्यानंतर आरोपीला एका खोलीत बंद करण्यात आले होते. पण, तो तिथूनही फरार झाला होता. फक्त जिन्यात असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपी दिसला होता. त्यावरून पोलिसांनी त्याचा शोध घेतला.
चार दिवसांपासून गुंगारा देत असलेल्या आरोपीला पोलिसांनी २० जानेवारी रोजी ठाणे शहरातून अटक केली. चौकशीनंतर आरोपीबद्दल माहिती समोर आली. आरोपी बांगलादेशी घुसखोर असून, त्याला परत जाण्यासाठी पैसे हवेत होते. इतकेच नाही, तर तो बांगलादेशचा राष्ट्रीय कुस्तीपटू देखील आहे.