'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय', 'काकस्पर्श', 'टेक केअर गुड नाईट', 'चिमणी पाखरं', 'अस्तित्व' अशा सिनेमांमधून अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवणारे अभिनेते म्हणजे सचिन खेडेकर. मराठी रंगभूमीपासून सचिन यांनी त्यांच्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली. गेल्या काही वर्षांमध्ये सिनेसृष्टीत व्यस्त असल्याने सचिन खेडेकर मराठी नाटकांमध्ये दिसले नाहीत. परंतु आता तब्बल २१ वर्षांनी सचिन खेडेकर तब्बल २१ वर्षांनी पुन्हा मराठी व्यावसायिक रंगभूमीकडे वळले आहेत. विशेष म्हणजे सध्या गाजत असलेल्या 'छावा' सिनेमाच्या गीतकाराने अर्थात क्षितीज पटवर्धनने हे नाटक लिहिलं आहे. जाणून घ्या.सचिन खेडेकर पुन्हा रंगभूमीवर'गेट वेल SOON!', 'हॅम्लेट', 'हसवा फसवी', 'वाडा चिरेबंदी', 'मग्न तळ्याकाठी', 'युगान्त', 'संज्या छाया', 'हरवलेल्या पत्त्यांचा बंगला', 'चारचौघी', 'आज्जी बाई जोरात' आदी मराठी व्यावसायिक रंगभूमी गाजवणाऱ्या दर्जेदार नाटकांची परंपरा जपणाऱ्या जिगिषा आणि अष्टविनायक या निर्मिती संस्थांनी पुन्हा एकदा नवीन नाट्यकृतीचे शिवधनुष्य उचलले आहे. 'भूमिका' असं या नवीन नाटकाचं नाव आहे. आयुष्यात प्रत्येकाच्याच वाट्याला एक 'भूमिका' येते. भूमिका जगण्यासाठी तुम्ही प्रत्येक वेळी कलावंतच असण्याची गरज नसते... असे म्हणत जिगिषा अष्टविनायक एक नवीन नाटक घेऊन येत आहेत. चंद्रकांत कुलकर्णी सादरकर्ते असलेल्या 'भूमिका' या नाटकाद्वारे सचिन खेडेकर रंगभूमीवर पुनरागमन करणार आहेत. अभिनेते सचिन खेडेकर यांनी आजवर दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर मराठीत चित्रपट, मालिका, नाटक या तीनही माध्यमांत आपला ठसा उमटवला असून, सोबत हिंदी, तेलुगू, गुजराती, तमिळ, मल्याळम चित्रपट तसेच वेब सीरिजमध्येही त्यांच्या अनेक भूमिका लक्षवेधी ठरल्या आहेत.
आता आगामी 'भूमिका' या नाटकात ते कोणत्या रूपात रसिकांच्या भेटीला येतात याची उत्सुकता आहे. या नाटकातील सचिन खेडेकर यांच्या व्यक्तिरेखेबाबतची माहिती सध्या तरी गुलदस्त्यातच आहे. त्याचप्रमाणे नाटकातील इतर कलाकार आणि तंत्रज्ञ कोण असणार ? याची माहितीसुद्धा लवकरच उलगडली जाणार आहे. क्षितीज पटवर्धन यांनी या नाटकाचे लेखन केले असून, चंद्रकांत कुलकर्णी या नाटकाचे दिग्दर्शन करत आहेत. सध्या नाटकाची जोरदार तालीम सुरू असून, याच महिन्यात हे नाटक रंगभूमीवर येणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे.