Join us

राजामौलींची 'ती' इच्छा अद्याप अपूर्णच, आनंद महिंद्रांना उत्तर देत म्हणाले, "पाकिस्तानने परवानगी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 08:39 IST

विविध विषयांवर चित्रपट बनवणारे राजामौली दरवेळी काहीतरी अफाट आणि वेगळं देण्याचा प्रयत्न करतात.

'आरआरआर', 'बाहुबली','मगाधिरा' असे एकापेक्षा एक दर्जेदार सिनेमे देणारे दिग्दर्शक एस एस राजामौली (S S Rajamouli) यांची एक इच्छा आहे जी अद्याप पूर्ण होऊ शकलेली नाही. विविध विषयांवर चित्रपट बनवणारे राजामौली दरवेळी काहीतरी अफाट आणि वेगळं देण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या मनातील गोष्ट पडद्यावर येते तेव्हा ते काहीतरी भव्यच असतं. पण अशी एक गोष्ट आहे जी हा दिग्दर्शक अद्याप करु शकलेला नाही. तो गोष्ट म्हणजे प्राचीन सिंधू संस्कृतीवर चित्रपट काढायची इच्छा. 

होय. राजामौली यांना प्राचीन सिंधू संस्कृतीवर पडद्यावर आणायची इच्छा होती. त्यासाठी ते पाकिस्तानातही गेले. मात्र त्यांना मोहेंजोदरो येथे जाण्याची परवानगी मिळू शकली नाही. राजामौली यांनी स्वत: ट्वीट करुन ही माहिती दिली.  उद्योजक आनंद महिंद्रा यांनी हडप्पा संस्कृतीचा एक फोटो ट्वीट केला. त्यात त्यांनी राजामौलींनी टॅग करत लिहिलं,"तुम्ही या प्राचीन संस्कृतीवर एक सिनेमा बनवायला हवा, त्यातून प्राचीन सभ्यतेविषयी आपल्या लोकांना माहिती मिळेल."

या ट्वीटला राजामौली यांनी उत्तर देत लिहिले,"हो सर...धोलाविरा इथे मगाधिरा सिनेमाचं शूटिंग करत असताना मला एक झाड दिसलं. ते प्राचीन काळातील होतं आणि त्याचं रुपांतर जीवाश्मात झालं होतं. त्या झाडाला बघून मी तेव्हाच सिंधू संस्कृतीचा उदय आणि अस्त  यावर सिनेमात बनवायचा विचार केला. काही वर्षांनंतर मी पाकिस्तानला गेलो. मोहेंजोदरो ला जाण्याचे खूप प्रयत्न केले पण दुर्दैवाने मला परवानगी नाकारली." 

मोहेंजोदरो हे ऐतिहासिक ठिकाण आहे. पाकिस्तानातील सिंधू नदीकाठी ते वसले आहे. तिथे सिंधू संस्कृतीचे अनेक अवशेष आढळतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानात झालेल्या अतिवृष्टीमुळे इथला बराच भाग खचला असल्याने तिथे पर्यटकांना जाण्यास बंदी करण्यात आली आहे.

टॅग्स :एस.एस. राजमौलीसिनेमाबॉलिवूडपाकिस्तानआनंद महिंद्रा