२०२२ साली प्रदर्शित झालेला'कांतारा' हा कन्नड चित्रपट चांगलाच गाजला होता. साऊथ स्टार ऋषभ शेट्टी या सिनेमात मुख्य भूमिकेत होता. तर या सिनेमाचं दिग्दर्शनही त्यानेच केलं होतं. या सिनेमाने ऋषभ शेट्टीला रातोरात स्टार केलं होतं. ‘कांतारा’ चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड भावला होता. 'कांतारा'ला मिळालेल्या यशानंतर त्याच्या सीक्वलची घोषणा करण्यात आली होती. शिवाय चाहतेही या सिनेमाच्या सीक्वलची आतुरतेने वाट पाहत होते. आता 'कांतारा'च्या सीक्वलचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.
'कांतारा' सिनेमाच्या सीक्वलचं नाव 'कांतारा चॅप्टर १' असं असणार आहे. या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं असून रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. या पोस्टरवर ऋषभ शेट्टी हातात शस्त्र घेऊन उभं असल्याचं दिसत आहे. खरं तर 'कांतारा चॅप्टर १' हा सिनेमा सीक्वल असला तरी तो 'कांतारा' सिनेमाचा प्रिक्वेल आहे. या सिनेमासाठी ऋषभने प्रचंड मेहनत घेतली आहे. २०२५मध्ये 'कांतारा चॅप्टर १' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण, यासाठी चाहत्यांना आणखी थोडी कळ सोसावी लागणार आहे.
२०२५च्या ऑक्टोबर महिन्यात 'कांतारा चॅप्टर १' प्रदर्शित केला जाणार आहे. २ ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंतीच्या मुहुर्तावर 'कांतारा चॅप्टर १' थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना 'कांतारा' सिनेमाच्या या पुढच्या भागासाठी आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे.