Rinku Rajguru: 'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) आणि कोल्हापूरमधील भाजप खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा कृष्णराज महाडिक (Dhananjay Mahadik Son Krishanaraaj ) सध्या चर्चेत आले आहेत. काल कृष्णराज महाडिकनं km.office या इन्स्टग्राम अकाउंटवरुन (Krishanaraaj Mahadik Photo With Rinku Rajguru) अभिनेत्री रिंकू राजगुरुसोबतचा फोटो शेअर केला होता. त्या फोटोनं सर्वाचं लक्ष वेधलं होतं. आता त्या फोटोनंतर रिंकूची इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत आली आहे.
कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीच्या मंदिराबाहेर कृष्णराज आणि रिंकू एकत्र पाहायला मिळाले होते. कृष्णराजच्या km.office या कार्यालयाकडून इन्स्टाग्राम हँडलवरुन दोघांचा फोटो शेअर करण्यात आला होता. कॅप्शनमध्ये लिहलं होतं, "आज अभिनेत्री रिंकू राजगुरू कोल्हापूर येथे आल्या आणि त्यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले". या फोटोवर नेटकऱ्यांनी लाईक्सचा वर्षाव तर केलाच. पण, विविध कमेंटही केल्या होत्या. "वहिनीसाहेब", "महाडिकांची तिसरी सून", "जोडी खूप छान दिसते", अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या होत्या.
यानंतर मात्र रिंकूनं तिचा एकटीचा एक सुंदर फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला. स्टोरीत कृष्णराजसोबत महालक्ष्मी मंदिरात काढलेल्या फोटोतील तोच लूक फोटो दिसला. विशेष म्हणजे या फोटोत तिची नजर खाली झुकलेली दिसतेय. या फोटोला तिनं "ओ रंगरेझ.. अपने रंग मे मुझको रंग दे" हे गाणं लावलं. तिच्या या स्टोरीवरुन चाहत्यांनी अनेक अंदाज बांधले आहेत. दोघांनीही नेटकऱ्यांच्या कमेंटवर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
दरम्यान, रिंकू राजगुरू सोमवारी कोल्हापुरात पार पडलेल्या 'राजर्षी शाहू महोत्सवात' उपस्थित होती. त्यानंतर तिनं कोल्हापुरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं. नेमकं त्याचवेळी कृष्णराज महाडिक देवीच्या दर्शनासाठी मंदिरात आले आणि दर्शनावेळी दोघांची भेट घडून आली. त्या भेटीदरम्यान त्यांनी फोटो काढला. तोच फोटो कृष्णा महाडिक यांनी सोशल मीडियावर शेअर केला, अशी माहिती समोर आली आहे. कृष्णराज महाडिक हा भाजप खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा आहे. तो राजकारणात सक्रिय आहे. याचसोबत तो युट्यूबरदेखील आहे. तर उत्तम रेसरदेखील आहे. तो नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून सक्रिय असतो.