अनुराग कश्यप हा असा व्यक्ती आहे जो त्याच्या सिनेमांमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतो. 'गँग्ज ऑफ वासेपूर', 'अग्ली', 'मनमर्जिया', 'मुक्काबाज' अशा विविध सिनेमांमधून अनुरागने त्याचं दिग्दर्शकीय वेगळेपण दाखवलं आहे. आता तब्बल तीन वर्षांनी अनुरागने त्याच्या नवीन सिनेमाची घोषणा केली तो म्हणजे 'निशांची'. दिग्दर्शक म्हणून अनुरागचा हा नवीन सिनेमा असल्याने सर्वांना उत्सुकता होती. निशांचीचा मराठीत अर्थ होतो उत्तम नेमबाज. तीन वर्षांनी दिग्दर्शनात परतलेल्या अनुरागने 'निशांची'च्या माध्यमातून उत्तम निशाणा साधलाय की त्याचा नेम चुकलाय? जाणून घ्याकथानक:
'निशांची'चं कथानक कानपूर शहरात घडतं. या शहरात बबलू आणि डबलू ही जुळी भावंडं चोरी करुन पैसा कमावत असतात. दोघा भावांपैकी बबलू हा बिनधास्त. तर डबलू काहीसा भित्रा. तरीही भावावर विश्वास ठेऊन, मनाला पटत नसतानाही डबलू त्याला चोरीत साथ देतो. या दोघांशिवाय बबलूची गर्लफ्रेंड रिंकू (वेदिका पिंटो) सुद्धा त्यांच्यासोबत असते. पहिल्या काही मिनिटानंतर सिनेमा फ्लॅशबॅकमध्ये जाते.
या दोन जुळ्या भावांचा जन्म कसा झाला? त्यांचा बाप कोण असतो? त्यांच्या आईने किती कष्ट घेतले असतात? अशा सर्व गोष्टी दिसतात. या हसत्या खेळत्या कुटुंबाचं आयुष्य एका घटनेने उद्धवस्त होतं. त्यामुळे बबलूच्या मनात खूप राग असतो. आईशी खोटं बोलून तो बाहेर वाईट गोष्टी करत असतो. अशातच बबलूला अटक होते. जाताना तो जेलमधून एक चिठ्ठी पाठवतो. त्या चिठ्ठीत काय लिहिलं असतं? बबलूला अटक झाल्यावर पुढे काय होतं? या कुटुंबाची पार्श्वभूमी नक्की काय असते? याची उत्तरं तुम्हाला 'निशांची' पाहून मिळतील.
दिग्दर्शन:अनुराग कश्यपने 'निशांची'च्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पुन्हा एक खास 'प्रयोग' केलाय. सुरुवातीच्या पंधरा मिनिटातच अनुरागने प्रेक्षकांना खिळवून ठेवलंय. 'निशांची'मधील व्यक्तिरेखांचा प्रवास पाहताना प्रेक्षक म्हणून आपण कथेत गुंतून राहतो. कथा नेहमीची असली तरीही अनुरागची दिग्दर्शकीय मांडणी अनोखी आहे. ही कथा अनुरागनेच लिहिली असल्याने ती मोठ्या पडद्यावर कशी दाखवायची हे त्याला चांगलंच माहित होतं. त्यामुळे वर्तमान आणि भूतकाळात घडलेल्या घटनांचा सिनेमात हुशारीने वापर करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे खूप दिवसांनी बॉलिवूड सिनेमाच्या संवादांवर टाळ्या पडल्या आहेत. 'एक तरफ है मुघल-ए-आझम और दुसरी तरफ हम आपके है कौन, अभी आपके उपर है आप क्या चुनते हो, दोनो ही पिक्चर ब्लॉकबस्टर थी' असे खास 'कानपुरी' संवाद प्रेक्षकांकडून वाहवा मिळवतात. संगीत आणि गाणी सुद्धा सिनेमाचं कथानक पुढे नेण्याचं काम करतात. एकूणच 'निशांची'निमित्ताने पुन्हा एकदा अनुरागने, तो बॉलिवूडचा वेगळा दिग्दर्शक म्हणून का ओळखला जातो, हे दाखवून दिलंय.
आईच्या भूमिकेत मोनिका पवारने प्रेक्षकांचं मन जिंकलंय. मोनिका गेली अनेक वर्ष सिनेमा, वेबसीरिजमध्ये काम करतेय. त्यामुळे इतक्या वर्षांचा समृद्ध अनुभव तिच्या अभिनयात झळकतो. विनित कुमार सिंगने सुद्धा त्याची छोटीशी भूमिका इतकी दमदार साकारली आहे, की सिनेमा संपल्यावरही आपण त्याला विसरत नाही. इतर भूमिकांमध्ये कुमुद मिश्रा, वेदिका पिंटो, दुर्गेश कुमार, घनश्याम गर्ग यांनीही चांगलं काम केलंय.सकारात्मक बाजू: कथा, गाणी, संगीत, दिग्दर्शन, अभिनयनकारात्मक बाजू: सिनेमाची लांबी, काही प्रसंग उगाच ताणले आहेतएकूणच 'निशांची' हा आजच्या काळातील युवा पिढीला आवडेल असा 'गँग्ज ऑफ वासेपूर' आहे, असं म्हटल्यास वावगं ठरु नये. विशेष गोष्ट म्हणजे, 'गँग्ज ऑफ वासेपूर'चे जसे दोन भाग आले होते तसा 'निशांची'चा सुद्धा पार्ट २ येणार, हे सिनेमाच्या शेवटी मिळणारं सरप्राईज आहे. एकूणच नव्या कलाकारांवर विश्वास ठेऊन अनुरागने बनवलेला 'निशांची' नक्कीच चित्रपटगृहात बघण्यासारखा आहे.