'पुष्पा' फेम अल्लू अर्जुनसाठी (Allu Arjun) आजचा दिवस फारच मोठा होता. ४ डिसेंबर रोजी 'पुष्पा २'च्या प्रीमिअरला संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी आज तेलंगणा पोलिसांनी अल्लू अर्जुनलाही ताब्यात घेतलं. इतकंच नाही तर नामपल्ली कोर्टाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. शेवटी तेलंगणा हायकोर्टाकडून त्याला जामीन मिळाला. या सर्व घटनाक्रमावर आता 'पुष्पा'ची अभिनेत्री रश्मिका मंदानाची (Rashmika Mandanna) प्रतिक्रिया समोर आली आहे.
घडलेल्या घटनेवर रश्मिका मंदानाने ट्वीट करत लिहिले, "हे मी काय पाहतीये...माझा विश्वासच बसत नाहीए. जे घडलं ते खूप दुर्दैवी आणि अत्यंत दु:खद होतं. तथापि, केवळ एकाच व्यक्तीवर आरोप होत आहेत हे फार वाईट आहे. ही परिस्थिती अत्यंत अविश्वसनीय आणि निराशाजनक अशीच आहे."
'पुष्पा २: द रुल' सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालतोय. सिनेमाने एका आठवड्यात बॉक्स ऑफिसवर ७०० कोटींचा टप्पा पार केला आहे. प्रदर्शनाच्या दिवशीच या सिनेमाने १५० कोटींच्या घरात कमाई केली होती. २०२१ साली आलेल्या 'पुष्पा'चा हा सीक्वेल आहे. रश्मिका मंदाना, फहाद फासिल यांचीही सिनेमात भूमिका आहे.