अभिनेता रामचरण तेजा (Ram charan) सध्या आगामी 'गेम चेंजर' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. कालच सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला. चाहत्यांनी ट्रेलरला उत्तम प्रतिसाद दिला असून आता सर्वांनाच सिनेमाची उत्सुकता आहे. रामचरण आणि पत्नी उपासना यांना एक वर्षाची गोंडस मुलगीही आहे. क्लिन कारा असं तिचं नाव ठेवण्यात आलं आहे. या चिमुकलीने वडिलांना टीव्हीवर स्क्रीनवर पाहिले. तेव्हाची तिची रिअॅक्शन कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
रामचरण तेजाची पत्नी उपासनाने ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने घरात टीव्हीवर नेटफ्लिक्सवरील RRR: behind and beyond ही डॉक्युमेंटरी लावली आहे. हा सिनेमा कसा आयुष्य बदलून टाकणारा होता असं तिने लिहिलं आहे. दरम्यान टीव्ही स्क्रीनवर रामचरण दिसताच चिमुकली क्लिनकारा ओरडताना दिसत आहे. तिने क्युट असा लाल फ्रॉक घातला आहे. "ती पहिल्यांदाच वडिलांना अशी टीव्हीवर पाहत आहे. रामचरण आम्हाला तुझा अभिमान वाटतो. ऑल सेट फॉर गेम चेंजर", असं उपासनाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
रामचरण तेजा आणि उपासना हे साऊथमधलं लोकप्रिय कपल आहे. १४ जून २०१२ मध्ये ते लग्नबंधनात अडकले होते. लग्नानंतर ११ वर्षांनी २० जून २०२३ रोजी उपासनाने मुलीला जन्म दिला. तिचं नाव क्लिनकारा ठेवल्यावर या हटके नावाची खूप चर्चा झाली. उपासना आणि रामचरण यांची मिळून एकूण संपत्ती तब्बल २५०० कोटी रुपये आहे. दोघंही आपल्या कुटुंबासोबतच राहत असून सर्व दाक्षिणात्य परंपरांचं पालन करताना दिसतात. म्हणूनच हे सर्वांचंच लाडकं कपल आहे.