Join us

'जनम का साथ हैं..'!; स्मिता पाटीलचं गाणं ऐकल्यामुळे राज बब्बर भावुक; म्हणाले, 'हे तिचं शेवटचं...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 17:06 IST

Raj babbar: हे गाणं स्मिता पाटील आणि राज बब्बर यांच्यावर चित्रीत झालं होतं.

बॉलिवूडचा एक काळ गाजवणारी अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील (smita patil).  प्रचंड अभ्यासू आणि तितक्याच ताकदीने अभिनय सादर करणारी अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख होती. अत्यंत कमी कारकिर्दीत असंख्य सुपरहिट सिनेमा देणाऱ्या स्मिता पाटील यांचं फार कमी वयात जग सोडून गेल्या. परंतु, आजही त्या त्यांच्या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांमध्ये जिवंत आहेत.  स्मिता पाटील यांनी अभिनेता राज बब्बर (raj babbar) यांच्यासोबत लग्न केलं होतं. त्यामुळे त्यांच्या निधनामुळे आजही राज यांना त्यांची उणीव भासते. अलिकडेच या गोष्टीचा प्रत्यय सगळ्यांना आला.

सध्या सोशल मीडियावर राज बब्बर यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्मिता पाटील यांच्यावर चित्रीत झालेलं गाणं ऐकल्यानंतर ते प्रचंड भावू झाले. त्याचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी आलं.  हा व्हिडीओ व्हॉइस ऑफ इंडिया या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

राज बब्बर यांनी इंडियन आयडॉलच्या १४ व्या पर्वात हजेरी लावली होती. यावेळी या शोमध्ये एका स्पर्धकाने स्मिता पाटील आणि राज बब्बर यांच्यावर चित्रीत झालेलं यांचं ‘जन्म जन्म का साथ है हमारा तुम्हारा’ हे गाणं सादर केलं. हे गाणं ऐकल्यावर राज बब्बर प्रचंड भावूक झाले. त्यांच्या स्मिता पाटीलसोबतच्या सगळ्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. यावेळी त्यांनी त्यांच्या भावनांनाही वाट मोकळी केली.

"हे स्मिताचं शेवटचं गाणं होतं. कधी कधी आयुष्यामध्ये काही गाणी ऐकतांना खूप चांगलं वाटतं. पण या गाण्यांचा अर्थ फार वेगळा होऊन जातो", असं म्हणत ते प्रचंड भावूक झाले आणि त्यांना रडू कोसळलं. दरम्यान, राज बब्बर आणि स्मिता पाटील यांचं लव्ह मॅरेज होतं. त्या काळात घरातल्यांचा विरोध पत्करून त्यांनी लग्नगाठ बांधली होती. मात्र, प्रतिक बब्बरच्या जन्माच्यावेळी काही अडचणी आल्यामुळे स्मिता पाटील यांचं निधन झालं.

टॅग्स :राज बब्बरस्मिता पाटीलबॉलिवूडसिनेमा