Join us

पोलिसांनी मला ना धड नाश्ता करू दिला ना कपडे बदलायचा वेळ दिला; अल्लू अर्जुनचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 06:36 IST

हैदराबाद येथील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी अल्लू अर्जुनला तेलंगणा पोलिसांनी अटक केली होती.

हैदराबाद : झुकेगा नहीं साला... या डायलॉगमुळे चर्चेत असलेला पुष्पा फेम अल्लू अर्जुनची अखेर अंतरिम जामिनावर सुटका झाली. हैदराबाद येथील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी अल्लू अर्जुनला तेलंगणा पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला नामपल्ली न्यायालयाने १४ दिवसांची कोठडी सुनावली होती. त्याने याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. तिथे ‘पुष्पा’ला दिलासा मिळाला.

तेलंगणा उच्च न्यायालयाने त्याला अंतरिम जामीन मंजूर केला. न्यायाधीश म्हणाले, कुटुंबाप्रति आम्हाला सहानुभूती आहे. पण अल्लू अर्जुन एक अभिनेता आहे. त्याला त्याच्या हक्कापासून वंचित ठेवता येणार नाही. नागरिक म्हणून त्यालाही जगण्याचा आणि स्वातंत्र्याचा अधिकार आहे. 

वकिलाने युक्तिवाद केला की, ‘अल्लू तिथे आल्याने कोणाचा जीव गेला असे पोलिसांच्या निदर्शनात आले नव्हते. कलाकार सिनेमा रिलीजआधी प्रीमियरला हजेरी लावतातच.’ पोलिसांनी मला ना धड नाश्ता करू दिला ना कपडे बदलायचा वेळ दिला, अशी तक्रार अल्लूने केली. एखाद्याला अटक करण्यासाठी बेडरूममध्ये येणे, पोलिसांचे हे जरा अतिच झाले, असे अल्लू म्हणाला.

तिचा पती म्हणाला, मी खटला मागे घेताे४ डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्राण गमावलेल्या महिलेचा पती भास्करने शुक्रवारी सांगितले की, अभिनेता अल्लू अर्जुनची यामध्ये कोणतीही चूक नाही. खटला मागे घेण्यास आपण तयार आहेत.

२००० कोटी कमावणार...  एका युझरने म्हटले की, अल्लूच्या अटकेमुळे 'पुष्पा २'ची तिकिटविक्री वाढणार असून, आता हा चित्रपट २००० कोटी रुपये बिझनेस करेल.

जे घडतंय त्यावर विश्वास बसत नाही. सर्व गोष्टींसाठी एका व्यक्तीला दोषी ठवरणे योग्य नाही. हे अविश्वसनीय आणि हृदयद्रावक आहे.        - रश्मिका मंदाना,

टॅग्स :अल्लू अर्जुनपोलिस