Join us
Daily Top 2Weekly Top 5

Prakash Jha : थिएटरच्या सीटखाली १० महिन्यांची ‘ती, उंदरांनी कुरतडलेलं शरीर; प्रकाश झा अन् मुलीची हृदयस्पर्शी कहाणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 18:46 IST

Prakash Jha : प्रकाश झा बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक आहेत. पण सोबत एका मुलीचे सिंगल फादरही आहेत. प्रकाश झा यांना दिशा नावाची मुलगी आहे. दिशा ही त्यांची दत्तक मुलगी.  

राजनीती, गंगाजल २ असे एकापेक्षा एक दमदार सिनेमे देणारे दिग्दर्शक व अभिनेते प्रकाश झा (Prakash Jha) यांना सगळेच ओळखतात. प्रकाश झाबॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक आहेत. पण सोबत एका मुलीचे सिंगल फादरही आहेत. प्रकाश झा यांना दिशा नावाची मुलगी आहे. दिशा ही त्यांची दत्तक मुलगी.  ही दिशा आता मोठी झाली आहे. दिशाने काही चित्रपट निर्मितीमध्ये सहाय्यक म्हणून काम केलं. आता ती स्वत: एक चित्रपट निर्माती आहे. २०१९ मध्ये  दिशाने प्रकाश झा यांच्याबरोबर ‘फ्रॉड सैयां’ चित्रपटाची निर्मिती केली होती. तिचं ‘पान पेपर्स सीझर एंटरटेनमेंट’ नावाचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस आहे. या दिशाला प्रकाश झा यांनी कसं वाढवलं,याची कथा फारच प्रेरणादायी आहे. 

वयाच्या २० व्या वर्षी प्रकाश झा यांनी श्री वत्स नावाचा एक सिनेमा बनवला. या चित्रपटासाठी त्यांनी एका अनाथालयाच्या मुलांसोबत शूटींग केलं होतं. अनाथालयातील ही मुलं प्रेमाची किती भुकेली आहेत, हे त्यांना त्यावेळी जाणवलं. त्याचक्षणी एक मुलगी दत्तक घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. पुढे १९८५ साली प्रकाश झा यांनी दीप्ती नवल यांच्यासोबत लग्न केलं. दोघांचं बाळ जन्मास घालण्याचं प्लानिंग होतं. पण झा यांची एक मुलगी दत्तक घेण्याची इच्छा तेव्हाही कायम होती. २००२ साली दीप्ती नवल व प्रकाश झा यांचा घटस्फोट झाला. याचदरम्यान प्रकाश झा यांनी मुलीला दत्तक घेतलं.

 अनाथालयातून फोन आला अन्...

  1.   १९८८ मध्ये प्रकाश झा यांना दिल्लीतील अनाथाश्रमातून एक फोन आला. या अनाथालयात प्रकाश झा स्वयंसेवक म्हणून सेवा द्यायचे. एक १० दिवसांची मुलगी एका थिएटरच्या सीटखाली सापडल्याची माहिती त्यांना फोनवर कळली. त्या चिमुकल्या मुलीचं संपूर्ण शरीराला उंदराने कुरतडलं होतं. ठिकठिकाणी किडे चावले होते. तिला संसर्ग झाला होता. प्रकाश झा यांनी तातडीने त्या मुलीला घरी आणलं. तिला अगदी जीवापाड जपलं. मुलगी काही दिवसातच तंदुरुस्त झाली, त्यानंतर प्रकाश झा यांनी सर्व प्रक्रिया पार पाडून तिला दत्तक घेतलं. हीच ती दिशा.

एकीकडे प्रकाश झा यांच्या लेकीच्या येण्याने आनंद होता तर दुसरीकडे पत्नीशी घटस्फोट झाल्याचं दु:ख. वर्षभर प्रकाश झा यांनी स्वत: त्या मुलीला वाढवलं. तिला आंघोळ घालण्यापासून, खाऊ घालण्यापर्यंत अशी सगळी काळजी घेतली. मुलगी एक वर्षाची झाल्यावर प्रकाश झा यांनी चित्रपट सोडून पाटण्याला जाण्याचा निर्णय घेतला. पाटण्यात आल्यानंतर प्रकाश झा यांनी एनजीओची स्थापना केली आणि  मुलीला आपल्या आईकडे सोपवलं.मात्र चार वर्षांनी त्यांच्या आईचं निधन झालं. तेव्हा प्रकाश झा यांच्याकडे काम नव्हतं. ते फक्त एनजीओचं काम बघायचे. त्यामुळे त्यांनीच दिशा सांभाळायचा निर्णय घेतला. काही वर्षांनी ते मुंबईला परतले आणि तिथे दिशाचं शिक्षण सुरू झालं. हीच दिशा आता मोठी झाली आहे. पित्याचं नाव मोठं करू इच्छित आहे...

टॅग्स :प्रकाश झाबॉलिवूड