Join us

अभिनेत्री पल्लवी सुभाषच्या आईचं निधन, सोशल मीडियावर शेअर केली भावूक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 15:45 IST

आईच्या आठवणीत तिने लांबलचक पोस्ट शेअर करत भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

मराठी आणि हिंदी दोन्ही क्षेत्रात नाव कमावलेल्या अभिनेत्री पल्लवी सुभाषच्या (Pallavi Subhash) आईचं निधन झालं आहे. पल्लवीने सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. आईच्या निधनाने तिला प्रचंड धक्का बसला आहे. या धक्क्यातून ती सावरण्याचा प्रयत्न करत आहे. आईच्या आठवणीत तिने लांबलचक पोस्ट शेअर करत भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

पल्लवीने आईसोबतचा फोटो शेअर करत लिहिले, "आणखी एक दिवस सरला आणि आई मी तुझ्यासोबत घालवलेल्या अगणित आठवणींमध्ये रमले आहे. तुझं प्रेम, तुझा स्पर्श, तुझं असणं हे सगळं माझ्या मनात मी साठवून ठेवलं आहे. आज तुझ्याशिवाय आयुष्यात पुढे जात असताना तू ज्याप्रकारे कोणत्याही कठीण परिस्थितीचा सामना केलास ते मी कायम स्मरणात ठेवेन. तू सगळ्यांशी ज्या आत्मियतेने वागलीस तेच मीही पुढे घेऊन जाईन. 

तू मला वरुन पाहत आहेस असं म्हणत मी स्वत:चं सांत्वन करते. तुझं प्रेम माझ्यासोबत आहेच. प्रत्येक दिवसाला धैर्य आणि आत्मविश्वासाने सामोरं जाण्यासाठी तुझ्या आठवणी मला बळ देत आहेत. तुझं प्रेम वेळेच्या सर्व सीमा ओलांडून एक दिवस पुन्हा माझ्याकडे येईल यातच मी समाधान मानते.

तोपर्यंत मी तुझं प्रेम माझ्या मनात साठवेन, आपण घालवला प्रत्येक क्षण मी साजरा करते आणि मी जे काही करेन त्यात तुझी आठवण असेल. आई तू हे जग जरी सोडून गेली असलीस तरी पण तू सर्वांच्या मनात राहशील."

पल्लवी सुभाषच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत तिचं सांत्वन केलं आहे. पल्लवी सध्या जाहिरात क्षेत्रात रमली आहे. शिवाय काही मालिकांसाठी तिची लूक टेस्टही सुरु आहे. तसंच सिनेमांच्या स्क्रीप्टही ती वाचत आहे.

टॅग्स :पल्लवी सुभाषमराठी अभिनेतापरिवारसोशल मीडिया