Join us

शशांक केतकरने बाप्पाकडे केली भावूक मागणी, म्हणाला, "दमलेल्या बाबाची..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 11:21 IST

गणपती बाप्पाकडे काय मागणं मागितलं यावर शशांकने उत्तर दिलं आहे.

शशांक केतकर (Shashank Ketkar) टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेता आहे. 'होणार सून मी या घरची' मालिकेतील त्याने साकारलेली 'श्री'ची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. शशांकला श्री नावानेच जास्त ओळखलं जातं. सध्या तो 'मुरांबा' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. नुकतंच त्याच्याही घरी गणरायाचं आगमन झालं. यावेळी गणपती बाप्पाकडे काय मागणं मागितलं यावर शशांकने उत्तर दिलं आहे.

शशांक केतकरने २०१७ साली प्रियंका ढवळेसोबत लग्नगाठ बांधली. २०२१ मध्ये प्रियंकाने मुलाला जन्म दिला. त्याचं नाव ऋग्वेद असं ठेवण्यात आलं. शशांकने आजपर्यंत मुलाचा चेहरा दाखवलेला नाही. आपल्या मुलासाठी त्याने गणरायाकडे वेळ मागितल्याचं त्याने सांगितलं. एका मुलाखतीत शशांक म्हणाला,'मी बाप्पाकडे वेळ मागितला आहे. कारण मला माझ्या मुलासाठी वेळच काढता येत नाहीए याचं मला वाईट वाटतं. मी सकाळी शूटसाठी निघतो तेव्हा तो झोपलेला असतो आणि घरी उशिरा येतो तेव्हाही तो झोपलेला असतो. दमलेल्या बाबाची कहाणी आपण गाण्यामध्ये ऐकली तेच माझ्यासोबत घडतंय.म्हणून मी बाप्पाकडे वेळ मागितला आहे. तसंच सर्व सुखात राहो, शांततेत राहो, हीच प्रार्थना केली.'

शशांक केतकर नुकताच हंसल मेहतांच्या 'स्कॅम 2003' सिरीजमध्ये दिसला. त्याच्या भूमिकेचं सोशल मीडियावर खूप कौतुक होतंय. यामध्ये त्याचा लूक याआधी कधीही न पाहिलेला असा आहे. याशिवाय शशांक आगामी काही मराठी सिनेमांमध्येही दिसणार आहे.

टॅग्स :शशांक केतकरमराठी अभिनेतापरिवारसेलिब्रिटी गणेश