'बिग बॉस मराठी' फेम निक्की तांबोळी (Nikki Tamboli) सध्या सेलिब्रिटी मास्टरशेफ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमात तिच्यासोबत उषा नाडकर्णी, तेजस्वी प्रकाश, अभिजीत सावंत, दीपिका कक्करसह आणखीही काही कलाकारा आहेत. लाफ्टर शेफच्या धर्तीवरच हा नवा शो आहे. फराह खान, सेलिब्रिटी शेफ विकास खन्ना आणि रणवीर ब्रार हे शोमध्ये परीक्षक आहेत. दरम्यान शोमधील निक्की तांबोळीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये ती रडताना दिसत आहे.
सेलिब्रिटी मास्टरशेफ कार्यक्रमात सर्व सेलिब्रिटींना परीक्षक चॅलेंज देतात. त्याप्रमाणे कलाकारांना दिलेल्या वेळेत ती डिश बनवायची असते. एकंदर हा कार्यक्रम पाहताना धमाल येते. मात्र निक्की तांबोळीचा व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये ती रडताना दिसत आहे. निक्कीला तिच्या भावासोबतचा लहानपणीचा फोटो दाखवण्यात येतो. तो फोटो पाहताच तिच्या डोळ्यातून अश्रू येतात. ती रडायला लागते. यानंतर ती सांगते, 'हा माझा भाऊ आहे. तो आता या जगात नाही. तो माझ्याहून तीन वर्षांनी मोठा होता.'. भावाच्या आठवणीत निक्की भावुक होते. उपस्थित सर्वांनाच तिचं दु:ख बघवत नाही. परीक्षक तिला धीर देतात. 'मी अजूनही आईबाबांसमोर बसून नीट रडू शकलेले नाही. कारण मी रडले तर ते अजून रडतील.' असंही ती व्हिडिओत म्हणते.
निक्कीच्या भावाचं नाव जतिन होतं. कोरोना काळात ६ मे २०२१ रोजी त्याचं निधन झालं. निक्की 'खतरो के खिलाडी'च्या शूटसाठी जाणार होती त्याच्या आधीच भावाचं निधन झालं. जतिन आजारी होता. त्याला रुग्णालयात दाखल केलं होतं. त्याला कोरोनाही झाला होता. एक एक अवयव निकामी होत त्याचा मृत्यू झाला.