Join us

Nana Patekar Birthday: एकेकाळी झेब्रा क्रॉसिंग पेंट करायचे नाना पाटेकर, असाही काळ पाहिलाय की आजही खात नाहीत मिठाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2023 08:48 IST

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत निरनिराळ्या भूमिका साकारात नाना पाटेकर यांनी सर्वांच्याच मनावर आपली छाप सोडली आहे.

'वेलकम' (२००७) या चित्रपटात नाना पाटेकर यांनी विनोदी भूमिका साकारली तेव्हा लोकांना मोठे सरप्राईज मिळाले होते. केवळ हीच नाही, तर यापूर्वीही त्यांनी अशा काही भूमिका साकारल्या होत्या ज्यामुळे प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू फुललं होतं. नाना पाटेकर हे उत्तम अभिनेते, समजासेवक तर आहेतच, त्यासोबतच ते स्पष्ट वक्ते म्हणूनही ओळखले जातात.

विश्वनाथ पाटेकर उर्फ नाना पाटेकर यांच्या वडिलांचा टेक्सटाईल पेंटिंगचा एक छोटा व्यवसाय होता. परंतु त्यांच्या निकटवर्तीयांनी त्यांची फसवणूक केली आणि त्यानंतर त्यांचं सर्वकाही हिरावून गेलं. याचाच नाना पाटेकर यांच्यावरही परिणाम झाला आणि ते वयाच्या १३ व्या वर्षापासून काम करू लागले. चुनाभट्टी येथे चित्रपटांचे पोस्टर रंगवण्यासाठी ते ८ किलोमीटर पायी जा ये करत होते. तसंच यासाठी त्यांना महिन्याला ३५ रुपये मिळत होते, असं त्यांनी एका जुन्या मुलाखतीत म्हटलं होतं.

नाना पाटेकर यांनी झेब्रा क्रॉसिंगदेखील रंगवले आहे. आपल्या मुलांना खाण्यासाठी देण्यासही आपल्याकडे काही नाही, या विचाराने वडिल दु:खी होते, असं त्यांनी एका चर्चेदरम्यान सांगितलं होतं. ते कायम याच चिंतेत होते आणि एक दिवस त्यांना हृदयविकाराचा झटका आला. नाना पाटेकर यांचं वय २८ वर्षे होतं, तेव्हा त्यांच्या वडिलांनी जगाचा निरोप घेतला.

रागाचं कारण काय?आपल्यात राग आहे असं जाणवतं, पण यामागचं कारण काय याबद्दल खुद्द नाना पाटेकर यांनी एका जुन्या चर्चेदरम्यान सांगितलं होतं. “लहानपणापासून जे अपमान सहन केले आणि ज्याप्रकारची वागणूक सहन केली, कदाचित त्याचाच हा परिणाम आहे. आजही जुन्या दिवसांची आठवण आली की डोळ्यात पाणी येतं,” असं ते म्हणाले होते.

आजही मिठाई खात नाहीतआपल्या आईवडिलांना खूष पाहायचं होतं म्हणूनच लहानपणापासून काम करताना कोणतंही दु:ख होत नव्हतं असं त्यांनी सांगितलं होतं. आपल्याला मिठाई खूप आवडत होती. परंतु त्यावेळी मिठाई खायला मिळत नव्हती यासाठी त्यांनी मिठाई खाणं सोडून दिलं होतं आणि आजही आपण मिठाई खात नसल्याचं त्यांनी एका जुन्या मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं.

टॅग्स :नाना पाटेकरबॉलिवूड