ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर विविध भाषांतील खास चित्रपट, वेबसीरिज उपलब्ध आहेत. यापैकी काही चित्रपट आणि वेबसीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. क्राईम, सस्पेन्स थ्रिलरला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळताना दिसते. सध्या असाच एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट जोरदार चर्चेत आहे. या चित्रपटाच्या कथेनं आणि पात्रांनी प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.
कमी बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने त्याच्या दमदार कथेमुळे बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली. थिएटरनंतर हा चित्रपट ओटीटीवरही गाजतोय. या चित्रपटाचं नाव आहे 'ऑफिसर ऑन ड्यूटी'. प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. हिंदी, मल्याळम, तेलुगू, तमिळ आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.
आपल्या कर्तव्याला समर्पित असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याची कथा चित्रपटात पाहायला मिळते. ट्विस्टने परिपुर्ण असलेल्या या सिनेमाचं २०२५ मधील सर्वोत्कृष्ट सस्पेन्स-थ्रिलर म्हणून त्याचं कौतुक होत आहेत. २ तास १४ मिनिटांच्या या चित्रपटात कुंचाको बोबन मुख्य भूमिकेत आहे. तसेच विशाख नायर, जगदीश आणि प्रियामणी यांच्यादेखील महत्त्वाच्या भुमिका आहेत.
'ऑफिसर ऑन ड्यूटी'चं बजेट सुमारे १२ कोटी होतं. तर सिनेमानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर तब्बल ५३.८९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाला IMDb वर ७.६ चे मजबूत रेटिंग देखील मिळाले आहे.