स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'मुरांबा' (Muramba) मध्ये मोठा ट्विस्ट आला होता रमासारखीच दिसणारी माही इतके दिवस सर्वांसोबत रमा बनून राहत होती. मात्र सध्या रमा आणि माही एकमेकांना भेटलेल्या दिसत आहेत. इतकंच नाही तर अखेर रमा-अक्षयचीही भेट होणार आहे. होय, नवीन प्रोमोमध्ये रमा-अक्षयची भेट झाल्याचं दिसत आहे. माहीच रमाला तयार करते आणि मग रमा अक्षयला भेटायचा जाते. हा प्रोमो वाहिनीने सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.
प्रोमोमध्ये माही रमाला म्हणते,'रमा, मला तुला छान तयार करायचं आहे अक्षय तुझ्याकडे बघत राहायला हवा.' यानंतर रमा लाल साडी नेसून छान तयार होते. अक्षय आहे तिथे ती जाते. रमा अक्षयच्या मिलनासाठी लॉनवर छान डेकोरेशन केलेलं असतं. रमा तिथे पोहोचते, 'अहो मी आलीये तुमची खरी रमा' असं ती म्हणते. मात्र गेटला लॉक असतं. रमा गेटवर चढते आणि दुसऱ्या बाजूला उतरते. अक्षय रमाला आवाज देतो. रमा अहो असं म्हणत पळत अक्षयकडे जाते. दोघंही मिठी मारतात. अक्षय म्हणतो,'तुझ्या मिठीत असूनही डोळ्यातले आनंदाश्रू थांबतच नाहीयेत.' यावर रमा म्हणते, 'कारण तुमच्या हृदयाला कळलंय की तुझी खरी रमा आली आहे'.
रमा-अक्षयच्या मिलनाचा हा एपिसोड येत्या शनिवारी प्रसारित होणार आहे. हा एपिसोड बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 'आता रमा ला काही होऊ देऊ नका. रमा अक्षय भेट आनंदाने बघायला आवडेल', 'भेट तर दाखवतायेत पण घरच्यांना वाटेल ही माही आहे आणि काहीतरी विचित्र ट्विस्ट दाखवतील..' अशा कमेंट्स प्रेक्षकांनी केल्या आहेत.