Saif Ali Khan Attack Update:बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर (saif ali khan) चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वांद्रे पश्चिम येथील त्याच्या राहत्या घरामध्ये घुसून एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर हल्ला करत चाकूने वार केले. गुरुवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. त्यानंतर तातडीने अभिनेत्याला मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या सैफवर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून आता त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. त्यानंतर आता मुंबईपोलिसांनी याबाबतच्या तपासाबद्दल माहिती दिली आहे. चोरी करण्याच्या उद्देशाने हा हल्लेखोर अभिनेत्याच्या घरी गेला असल्याची प्राथमिक माहिती त्यांनी दिली आहे.
मुंबई पोलीस काय म्हणाले-
अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबाबत मुंबई पोलिस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी महत्त्वाची अपडेट दिली आहे. "अभिनेता सैफ अली खानच्या घरी जी घटना घडली, त्याबाबत केलेल्या प्राथमिक तपासात आम्हाला असे आढळून आले की, यातील हल्लेखोर इमारतीच्या पायऱ्यांचा वापर करून वरती गेला आणि फायर एक्झिटमधून घरात शिरला. याबाबत संशयित हल्लेखोराची माहिती आम्ही काढली आहेत. या हल्लेखोराच्या शोधासाठी १० पथके मुंबईतील विविध भागात पाठवण्यात आली आहेत. या प्रकरणातील हल्लेखोराला अटक केल्यानंतर बाकी सगळी माहिती देता येईल. परंतु, प्रथमदर्शनी तपासात हा हल्लेखोर चोरी करण्याच्या उद्देशानेच घरात शिरला होता, असे समोर आले आहे, अशी महत्त्वाची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
नेमकं काय घडलं?
काल रात्री एक अज्ञात माणूस सैफ अली खानच्या घरात घुसला. त्या माणसाने अभिनेत्याच्या मोलकरणीशी वाद घातला. परंतु जेव्हा सैफ त्या व्यक्तीला शांत करण्याचा प्रयत्न करत होता त्याचक्षणी त्याच्यावर हल्ला करण्यात आला. या घटनेत अभिनेता गंभीर जखमी झाला आहे. शिवाय मुंबई पोलीस या घटनेचा तपास करत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.