Join us
Daily Top 2Weekly Top 5

"हिरोएवढे पैसे आम्हाला का नाही?" मृणाल ठाकूरने उचलला मुद्दा, प्रियंका चोप्राचं केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 17:38 IST

प्रियंका चोप्रा ही माझ्यासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे.

'सीतारामम' सिनेमातून प्रेक्षकांना आपल्या सौंदर्याने घायाळ करणारी आणि अभिनयाने मन जिंकणारी अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur). मृणाल हिंदी आणि साऊथ अशा दोन्ही ठिकाणी अगदी दमदार कामगिरी करत आहे. 'लस्ट स्टोरीज 2' या हिंदी सिनेमात नुकतीच तिने भूमिका साकारली होती. तर आता तिचा 'हाय नॅना' हा साऊथचा सिनेमा आला आहे. याशिवाय मृणालचा 'फॅमिली स्टार' हा सिनेमाही येणार आहे. यानिमित्त दिलेल्या मुलाखतीत मृणालने इंडस्ट्रीतील महिलांचा पे स्केलचा मुद्दा उचलला आहे.

ईटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत मृणाल म्हणाली, "प्रियंका चोप्रा ही माझ्यासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. तिचे प्रत्येक आर्टिकल आणि मुलाखती मी पाहिल्या आहेत. लोकांना ट्रेंडसेटर महिला आवडत नाहीत. हो ला हो म्हणणाऱ्या महिला त्यांना हव्या असतात. मला फेमिनिस्ट समजू नका पण जेव्हा महिला लॉजिकने बोलतात तेव्हा पुरुषांना ते पटत नाही. मुलांना सगळीच सूट असते पण मुलींना नाही. तुम्हाला विचित्र वाटेल पण अनेकवेळा मला असं वाटलं आहे की मी मुलगी म्हणून का जन्माला आले. पण नंतर मी विचार करते की अशा अनेक महिला आहेत ज्या माझ्याकडे कौतुकाने पाहतात मी हरले तर त्यांच्यावरही याचा परिणाम होईल."

अभिनेत्रींना हिरोएवढं मानधन का नाही?

मृणाल म्हणाली, "मी अनेकदा तणावातून गेली आहे. मला यामुळे झोपही येत नाही. पण मी हार मानत नाही. मी माझ्या हक्कासाठी लढते. मला ओरडून ओरडून सांगायचं नाही की मला हिरोएवढी फी द्या. मला माहित आहे त्याला जास्त अधिकार आहे पण मला प्रश्न पडतो की अभिनेत्री प्रमोशनसाठी हव्या असतात, सिनेमात हव्या असतात मग त्यांना पैसे देताना कमी का दिले जातात? तिला प्राधान्य का दिले जात नाही. मी ज्या मानधनासाठी पात्र असेल तितकं मानधन मला मिळालं पाहिजे.  त्यात जमीन आसमानचा फरत नसावा."

टॅग्स :मृणाल ठाकूरबॉलिवूड