Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेता होण्यापूर्वी अशोक सराफ करायचे 'या' क्षेत्रात काम; सहकाऱ्यांमुळे सोडली पहिली नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 15:28 IST

Ashok saraf: अशोक सराफ सिनेसृष्टीत येण्यापूर्वी नेमकं काय करत होतं हे फारसं कोणाला माहित नाही.

मराठी कलाविश्वातील अष्टपैलू अभिनेता म्हणून अशोक सराफ यांच्याकडे पाहिलं जातं. आजवरच्या कारकिर्दीत अशोक सराफ यांनी अनेक गाजलेल्या सिनेमा मराठी सिनेसृष्टीला दिल्या. त्यांच्या सहजसुंदर अभिनयशैलीमुळे आज ते लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखले जातात. आयत्या घरात घरोबा, एक डाव भुताचा, अशी ही बनवाबनवी, सगळीकडे बोंबाबोंब अशा कितीतरी सिनेमांमध्ये झळकलेले अशोक सराफ सिनेसृष्टीत येण्यापूर्वी नेमकं काय करत होतं हे फारसं कोणाला माहित नाही. त्यामुळे त्यांच्या पहिल्या नोकरीविषयी जाणून घेऊ.

मराठी कलाविश्वात हक्काचं स्थान निर्माण करणारे अशोक सराफ चक्क अकाऊंट क्षेत्रात कार्यरत होते. एका बँकेमध्ये काम करत होते. विशेष म्हणजे अभिनयाचा ध्यास घेतलेल्या अशोक सराफ यांनी नोकरी आणि अभिनय यांचा समतोल कित्येक वर्ष सांभाळला. मात्र, त्यानंतर बँकेची नोकरी सोडून ते पूर्णपणे अभिनय क्षेत्रात उतरले. 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याविषयी भाष्य केलं होतं.

"1974 साली मी पहिला सिनेमा केला. मात्र, त्यावेळीही मी नोकरी सोडली नव्हती. मी बँकेत काम करत होतो. पण चित्रपटाच्या चित्रीकरणामुळे मला बँकेत रोज जाणं जमत नव्हतं. 1978 साली तर मी संपूर्ण वर्षभर बँकेत गेलोच नव्हतो. मला बरं नाहीये असं सांगून मी मेडिकल सर्टिफिकेट दिलं होतं.पण, मी काही महिन्यांपासून मी ऑफिसला जात नसल्यामुळे बँकेतले काही वरिष्ठ मंडळी मला घरी भेटायला आले होते. त्यावेळी मी घरी नव्हतो.  त्यावेळी घरी माझी बहीण होती, आणि मी कोल्हापुरला गेल्याचं तिने बँकेच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं", असं अशोक सराफ म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "बहिणीने दिलेल्या उत्तरामुळे माझं सत्य समोर आलं असं मला वाटलं होतं. पण, बँकेच्या लोकांनी मला खूप सांभाळून घेतलं. त्यांनी जवळपास माझा ३ महिन्यांचा रिपोर्ट वरिष्ठांना दिलाच नाही. माझ्या बँकेतले मित्र माझ्या वाट्याचं काम करत होते. मी चित्रपटात काम करत असलो तरी नोकरी सोडण्याचा धोका मी पत्करू शकत नव्हतो. त्यामुळे मला नोकरीतून हकलून देत नाही तोपर्यंत मी नोकरी सोडणार नाही असेच मी ठरवले होते. पण अखेर माझ्यामुळे माझ्या सहकर्मचाऱ्यांना त्रास होत आहे असे मला वाटल्याने मी नोकरी सोडली." दरम्यान, अशोक सराफ आज मराठी कलाविश्वातील सुपरस्टार आहेत. आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे केले आहेत. 

टॅग्स :अशोक सराफसेलिब्रिटीसिनेमा