Join us
Daily Top 2Weekly Top 5

Nagraj Manjule : 'सैराट २' खरंच येणार का? प्रेक्षकांच्या मनातला प्रश्न अन् नागराज मंजुळेंचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 13:06 IST

Nagraj Manjule : 'घर बंदूक बिरयानी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सिनेमाच्या निमित्ताने नागराज अण्णा 'सैराट २'बद्दल बोलले. 'लोकमत फिल्मी'च्या 'फिल्मी पंचायत' या कार्यक्रमात त्यांनी यावर खुलासा केला.

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी मराठी चित्रपट विश्वात क्रांती घडवून आणली.  चोकोरीबध्द सिनेमाची चौकट मोडून त्यांनी 'पिस्तुल्या' आणला, मग 'फॅन्ड्री' आणि मग 'सैराट'... यापैकी 'सैराट'ने (Sairat) नागराज यांना अफाट यश मिळवून दिलं. नागराज अण्णांच्या या सिनेमानं १०० कोटींचा टप्पाही पार केला. १०० कोटी पार करणारा 'सैराट' हा पहिला मराठी चित्रपट ठरला. 'सैराट' २९ एप्रिल २०१६ रोजी रिलीज झालेल्या या सिनेमाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. याच 'सैराट'चा दुसरा पार्ट येणार का, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून ऐकायला मिळतेय. 'लोकमत फिल्मी'च्या ' Filmy Panchayat' या कार्यक्रमात खुद्द नागराज यांनी यावर खुलासा केला.

काय म्हणाले नागराज मंजुळे...'सैराट २' (Sairat 2) येणार का तमाम मराठी प्रेक्षकांच्या मनातला प्रश्न नागराज यांना यावेळी विचारण्यात आला. यावर नागराज म्हणाले, मी 'सैराट २' येणार आहे का हे पण सांगू शकत नाही आणि नाही असंही म्हणणार नाही. कारण आत्ता असा काही विचार नाही. भविष्यात माहित नाही. घर बंदूक बिरयानी सारखा सिनेमा करशील का असं तर आधी तुम्ही मला विचारलं असतं तर मी नाही करणार, असंच उत्तर दिलं असतं. पण आता मी हा सिनेमा केला. मी असं काय म्हणतोय, हे तुम्हाला घर बंदूक बिरयानी (Ghar Banduk Biryani) बघितल्यानंतर कळेल. त्यामुळेच 'सैराट २' करणार आहे असंही नाही, पण लगेच करणार असंही नाही...

'सैराट' केला ना तेव्हा...'सैराट' केला ना तेव्हा 'सैराट २' करायचाये असं काहीही नव्हतं. कारण 'सैराट'ची कथा मुळातच परिपूर्ण कथा आहे. फॅन्ड्री या सिनेमाबद्दलही लोक मला विचारतात. त्याची कथा लोकांना अपूर्ण वाटली होती. पण ती पूर्ण आहे. सध्या तरी मी नाही, हो काहीही म्हणणार नाही. मी ज्या गोष्टी निवडतोय, त्या गोष्टीनं मला उत्साहित केलं पाहिजे. घर बंदूक बिरयानी हा सिनेमा मी ज्याप्रकारचे सिनेमे करतो, त्यापेक्षा अगदी वेगळी आहे. फॅन्ड्री, सैराट, झुंड याचा अंदाज घेऊन तुम्ही घर बंदूक बिरयानी बघायला आलात तर तुमचा हिरमोड होईल. पण काहीही विचार न करता पाहायला आलात तर तुम्हाला मजा येईल. त्यामुळे भविष्यात आपण काय करू, हे मलाच माहित नाहीये, असं त्यांनी सांगितलं.

टॅग्स :नागराज मंजुळेमराठी चित्रपटसैराट 2मराठी अभिनेता