एखादी गाडी घेण्यासाठी अनेक कलाकार बँकेतून कर्ज काढतात. याशिवाय कोणी व्यक्ती इतरांकडून कर्जाच्या स्वरुपात पैसे घेऊन स्वतःचं स्वप्न पूर्ण करतात. पण एका ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने कोणाकडून एक रुपया न घेता, कुठलंही कर्ज न काढता महागडी मर्सिडीज गाडी घेतली आहे. हे ज्येष्ठ अभिनेते आहेत मोहन जोशी.मोहन जोशींना (mohan joshi) गाड्यांचा शौक असून त्यांनी आजवर १२-१३ गाड्या वापरल्या आहेत. मोहन जोशी काय म्हणाले, जाणून घ्या.
मोहन जोशींचा खुलासा
मोहन जोशींनी कांचन अधिकारींच्या बातो बातो में या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, "एकदा मुंबईमध्ये असताना माझे आई-वडील घरी यायचे होते. आई-वडिलांना मुंबई दाखवायची आहे तर बसमधून त्यांना घेऊन जाणं बरोबर नाही. ट्रेनमधून त्यांना घेऊन जाणं शक्यच नव्हतं. त्यामुळे गाडी घेण्याचा निर्णय घेतला. वांद्रे येथे एक प्रदर्शन सुरु होतं. तिथे पन्नास हजाराची गाडी घेतली. मला एके ठिकाणाहून पन्नास हजार अॅडव्हान्स रक्कम मिळाली होती. ती रक्कम तिकडे भरली आणि गाडी घेतली."
"चेंबुरला जाईपर्यंत ती गाडी सात वेळा बंद पडली. नंतर मी त्या गाडीसाठी २५ हजार खर्च केला. त्यामुळे ती ५० हजाराची गाडी मला ७५ हजाराला पडली. त्या गाडीतून मी नंतर आई-वडिलांना फिरवलं. पुढे ती गाडी मग विकून टाकली. त्यानंतर दुसरी फियाट गाडी घेतली. ती गाडी घेतल्यावर त्या गाडीचे पुणे-मुंबई प्रवासात आठ नटबोल्ट पडले. त्यानंतर ती गाडीही विकली. पुढे मी १२-१३ गाड्या घेतल्या. आता मर्सिडीज घेतली. कोणाकडून कुठलंच कर्ज न घेता मी मर्सिडीज घेतली.", अशाप्रकारे मोहन जोशींनी खुलासा केला. मोहन जोशी गेल्या अनेक वर्षांपासून मराठी मालिका, सिनेमा, रंगभूमीवर कार्यरत आहेत.