Join us
Daily Top 2Weekly Top 5

"रागाच्या भरात वडिलांनी कुऱ्हाड घेऊन माझ्या हातावर.."; उषा नाडकर्णींनी सांगितला भयावह प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 12:15 IST

उषा नाडकर्णींनी बालपणीची कटू आठवण सर्वांसोबत शेअर केली आहे. रागाच्या भरात वडिलांनी काय केलं, याचा खुलासा त्यांनी केला आहे

उषा नाडकर्णी या मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. उषा यांनी गेल्या काही वर्षांमध्ये अनेक मराठी आणि हिंदी प्रोजेक्ट्समध्ये काम केलंय ‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय मालिकेत उषा यांनी साकारलेली ‘सविता देशमुख’ची भूमिका चांगलीच लोकप्रि ठरली उषा नाडकर्णी यांनी त्यांच्या आयुष्यातील एक धक्कादायक अनुभव सांगितला आहे. वडील रागाच्या भरात काय करायचे, याचा गंभीर खुलासा उषा यांनी केला आहे

उषा यांच्या वडिलांचा भयानक राग

भारती सिंगसोबतच्या मुलाखतीत उषा नाडकर्णी यांनी सांगितले की, त्यांचे वडील वायुसेनेमध्ये अधिकारी होते आणि ते खूप शिस्तप्रिय होते. त्यांच्या रागाचा फटका अनेकदा कुटुंबाला बसत असे. लहान मुलांनी केलेली छोटीशी चूकही त्यांना सहन होत नसे. एकदा त्यांचा भाऊ आणि वडील यांच्यात वाद झाला, तेव्हा वडील रागाने कुऱ्हाड घेऊन त्याच्यावर धावले. उषाने मध्ये पडून भावाला वाचवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांच्या हातावर कुऱ्हाडीने वार केला, ज्यामुळे त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली होती.

उषा नाडकर्णी यांनी सांगितले की, त्यांचे वडील खूप विचित्र होते. मारहाण केल्यानंतर लगेचच ते मुलांना बाहेर फिरायला घेऊन जात किंवा आईस्क्रीम आणून देत. त्यांच्या याच स्वभावामुळे वडिलांच्या मनात नेमके काय चालले आहे, हे उषा यांना कधीच समजल नाही

अभिनेत्री होण्यासाठी आईचा विरोध

उषा यांनी सांगितले की, त्यांना अभिनेत्री बनायचे होते, पण त्यांच्या या निर्णयाला आई आणि वडिलांचा विरोध होता. जेव्हा त्यांनी पहिल्यांदा अभिनयात करिअर करायचे ठरवले, तेव्हा त्यांच्या आईने त्यांना खूप मारहाण केली. इतकेच नाही, तर त्यांचे कपडे रस्त्यावर फेकून त्यांना घरातून बाहेर काढले. त्यानंतर त्या एक आठवडा त्यांच्या मैत्रिणीच्या घरी राहिल्या. शेवटी त्यांच्या वडिलांनी त्यांना घरी परत आणले. अशाप्रकारे उषा नाडकर्णींनी बालपणातील हे कटू अनुभव सर्वांसमोर उघड केले.

टॅग्स :उषा नाडकर्णीटेलिव्हिजनमराठी चित्रपटबॉलिवूड