अभिनेता उमेश कामत (Umesh Kamat) आणि प्रिया बापट (Priya Bapat) ही मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी. त्यांच्या संसाराला १४ वर्ष झाली आहेत. आजकाल अनेक संसार मोडतायेत, घटस्फोट होत आहेत, किंवा लिव्ह इन ची संकल्पना रुजू होत आहे अशा परिस्थितीत प्रिया-उमेश आदर्श कपल आहेत. यामागचं त्यांचं गुपित काय यावर नुकतंच त्यांनी भाष्य केलं.
'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत उमेश कामत म्हणाला, "आमच्या नात्याचं गुपित वगैरे असं काही नाही. आम्ही जसे आहोत तसे राहतो. आमचं एकमेकांवर प्रेम आहे, एकमेकांना स्पेसही देतो, एकमेकांच्या आनंदात आनंद मिळतो. वैयक्तिकरित्या आम्ही व्यक्ती म्हणून कलाकार म्हणून प्रगत होत आहोत. आतापर्यंत आम्हाला कधीच एकमेकांचा कंटाळ आला असं मनात आलं नाही. भांडणं होतात, कडाक्याची होतात तेवढापुरता राग खूप येतो. पण कुठेतरी विश्वास असतो तसंच ते भांडण ओसरल्यानंतर प्रेमही तितक्याच पटीने वाढतं. त्यामुळे कदाचित आम्ही आजपर्यंत टिकून आहोत. अजून तरी आम्हाला एकमेकांचा कंटाळा आलेला नाही."
तर प्रिया बापट म्हणाली, "आम्ही अजूनही आमच्या नात्यात नवनवीन गोष्टी शोधत आहोत. आमचं नातं आजपर्यंत घट्ट आहे कारण एकमेकांबद्दल आत्मियता, प्रेम वाटणं हे त्यामागचं मुख्य कारण आहेच. ते जेव्हा संपेल तेव्हा सगळंच संपेल. त्याहीपलीकडे मला वाटतं की वैयक्तिक आयुष्यात माणूस म्हणून आम्ही जे पुढे जात आहोत त्याबद्दल आम्हाला एकमेकांसाठी प्रचंड आदर आहे. एक माणूस म्हणून वैयक्तिक स्तरावर मला त्याचा आणि त्याला माझा आदर वाटतो. ते असण्यानेच आमचं एकत्रित पुढे जाणं कदाचित जास्त सोपं होतं."
उमेश आणि प्रिया अनेक वर्षांनी मराठी सिनेमात एकत्र दिसणार आहेत. त्यांचा 'बिन लग्नाची गोष्ट' हा सिनेमा १२ सप्टेंबर रोजी रिलीज होत आहे. यामध्ये गिरीश ओक आणि निवेदिता सराफही मुख्य भूमिकेत आहेत.