Join us

हे असं छापणं चुकीचं....‘धर्मवीर’मध्ये एकनाथ शिंदे यांची व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता संतापला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 16:37 IST

Shivsena, Eknath Shinde : शिवसेनेचे निष्ठावंत नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. अशात ‘धर्मवीर - मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटात एकनाथ शिंदेंची भूमिका साकारणारा अभिनेता क्षितीश दाते चांगलाच संतापला आहे

शिवसेनेचे (Shivsena) निष्ठावंत नेते एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांच्या बंडामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. कालपासून राजकीय गोटात मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. अशात ‘धर्मवीर - मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer)  या चित्रपटात एकनाथ शिंदेंची भूमिका साकारणारा अभिनेता क्षितीश दाते (Kshitish Date) चांगलाच संतापला आहे. एका इन्स्टा स्टोरद्वारे त्याने आपला संताप व्यक्त केला आहे. ‘हे असं छापणं चुकीचं आहे,’ अशा शब्दांत त्याने आपली नाराजी बोलून दाखवली आहे.

क्षितीश का संतापला?मोठ्या पडद्यावर एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारणारा क्षितीश का संतापला? याचं उत्तर त्याच्या पोस्टमध्ये आहे. यात त्याने एका वृत्तपत्राच्या बातमीचं कात्रण जोडलं आहे.  राज्यातील राजकीय घडामोडींवरचे अनेक मजेशीर मीम्स सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत. शिवसेनेतील अनेक नेत्यांवरचे, स्वत: एकनाथ शिंदे यांच्यावरचे अनेक विनोद, मीम्स व्हायरल होत आहेत. एका वृत्तपत्राने असंच एक मीम आपल्या बातमीत टाकलं आणि नेमकी हीच बाब क्षितीशला खटकली.

क्षितीशचा एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेतला फोटो असलेलं हे मीम आहे. ‘थोडे दिवस मलाच एकनाथ समजून बैठकीत घ्या,’अशा आशयाचं हे मीम शेअर करत क्षितीशने नाराजी व्यक्त केली आहे.‘मोठी राजकीय उलाढाल सुरू असताना चेष्टेत मीम्स येणं वेगळं आणि वर्तमानपत्रात छापणं वेगळं. हे असं छापणं चुकीचं आहे,’ असं त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 क्षितीश नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर’ चित्रपटात  एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत दिसला होता. एकनाथ शिंदे यांची व्यक्तिरेखा त्याने अगदी हुबेहूब साकारली होती. हुबेहूब रूप, हूबेहूब देहबोली सगळीच क्षितीशने आत्मसात केली होती.   क्षितीश आषाढी वारीसाठी विशेष कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. आषाढी वारी निमित्त नवीन कार्यक्रम ‘हरी मुख म्हणा’ यामध्ये तो पाहायला मिळेल.

टॅग्स :एकनाथ शिंदेशिवसेनासिनेमासेलिब्रिटी