अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'आता थांबायचं नाय' या मराठी सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. हा सिनेमा सत्यघटनेवर आधारित असून मुंबई महानगरपालिकेत काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांच्या जिद्दीची गोष्ट यातून दाखवण्यात आली आहे. २०१६ मध्ये घडलेल्या घटनेपासून प्रेरित होऊन ही कथा रचलेली आहे. नापास कर्मचारी दहावीच्या परीक्षेत पास होण्यापर्यंतचा प्रवास दिग्दर्शक शिवराज वायचळ याने रंजकतेने पडद्यावर मांडला आहे. 'आता थांबायचं नाय' सिनेमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही या मराठी सिनेमाबाबत ट्वीट करत खंत व्यक्त केली आहे.
'आता थांबायचं नाय'बद्दल काय म्हणाले संजय राऊत?
'आता थांबायचं नाय' हा जबरदस्त मराठी चित्रपट मी पहिला! कथा, दिग्दर्शन आणि कलावंतांनी हा चित्रपट एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे! सफाई कामगारांच्या जीवनावर इतके ज्वलंत भाष्य मी अनुभवले नव्हते. हा चित्रपट आमिर खान वगैरेने केला असता तर सरकारपासून देशभरातील समीक्षकांनी वेगळा विषय म्हणून डोक्यावर घेतला असता. राष्ट्रीय पुरस्कार आणि ऑस्कर पुरस्कारपर्यंत ढकलला असता! हा चित्रपट पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी पाहायलाच हवा, त्यांना खरा देश कळेल!
दरम्यान, 'आता थांबायचं नाय' सिनेमात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधवसह आशुतोष गोवारीकर, सिद्धार्थ जाधव, प्राजक्ता हनमघर, किरण खोजे, प्रवीणकुमार डाळिंबकर, ओम भुतकर, पर्ण पेठे, श्रीकांत यादव आणि रोहिणी हट्टंगडी यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहुर्तावर हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली.