सई ताम्हणकर, समीर चौघुले, प्रसाद ओक, ईशा डे अशी स्टारकास्ट असलेला 'गुलकंद' १ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्या या सिनेमाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 'गुलकंद'ला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे. प्रेमाच्या 'गुलकंद'सोबत सिनेमा बॉक्स ऑफिवर पैशांचा गोडवादेखील चाखत आहे. ४ दिवसांत 'गुलकंद'ने बॉक्स ऑफिसवर कोटींची कमाई केली आहे.
'गुलकंद' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. या सिनेमाने प्रदर्शनाच्या दिवशीच ५५ लाखांची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत थोडी घट झाली होती. 'गुलकंद'ने दुसऱ्या दिवशी २५ लाख रुपयांचा गल्ला जमवला होता. त्यानंतर विकेंडला या सिनेमाच्या कमाईत घसघशीत वाढ झाल्याचं दिसलं. शनिवारी 'गुलकंद'ने ४२ लाख रुपये कमावले. तर रविवारी ५७ लाख रुपयांची कमाई केली. अशाप्रकारे विकेंडलाच 'गुलकंद' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ९९ लाख रुपये कमावले. अवघ्या ४ दिवसांतच 'गुलकंद' सिनेमाने १.७९ कोटींचा टप्पा गाठला आहे.
'गुलकंद' सिनेमात समीर चौघुले-सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक-ईशा डे यांच्या जोड्या प्रेक्षकांच्या भलत्याच पसंतीस उतरल्या आहेत. या सिनेमातील गाण्यांनीही प्रेक्षकांना वेड लावलं आहे. आता सिनेमा बॉक्स ऑफिसवर आणखी किती कमाई करतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.