'छावा' सिनेमा (chhaava) पाहिला नाही असा माणूस सापडणं दुर्मिळच. रिलीजआधीपासूनच 'छावा' सिनेमाची चर्चा होती. त्यामुळे जेव्हा 'छावा' रिलीज झाला तेव्हा पहिल्या दिवसापासूनच थिएटरमध्ये सिनेमा पाहण्यासाठी लोकांनी हाउसफुल्ल गर्दी केली. अशातच 'छावा' सिनेमात कान्होजीची भूमिका साकारणारा अभिनेता सुव्रत जोशीने (suvrat joshi) थिएटरबाहेर कान धरल्याचा फोटो व्हायरल झालाय. इतकंच नव्हे तर सुव्रतची पत्नी सखी गोखलेने (sakhi gokhale) याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.
सखी सुव्रतची भूमिका पाहून काय म्हणाली?
सखी गोखले नुकतीच 'छावा' पाहण्यासाठी थिएटरमध्ये गेली होती. यावेळी तिचा पती सुव्रत जोशीही तिच्यासोबत होता. सुव्रतने 'छावा' सिनेमात कान्होजीची भूमिका साकारलीय. फंदफितुरी करुन गणोजी- कान्होजी छत्रपती शंभूराजेंना कैद करण्यासाठी औरंगजेबाला साहाय्य करतात अशी कहाणी सिनेमात दिसते. कान्होजीची भूमिका सुव्रतने साकारली. त्यामुळेच सखीने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून सुव्रतचा एक फोटो पोस्ट केला. ज्यात तो थिएटरबाहेर कान धरत उभा असलेला दिसतो.
हा फोटो पोस्ट करुन सखी लिहिते की, "काम असं करा की तुमच्या बायकोचा गोंधळ झाला पाहिजे की, नवऱ्याने जी भूमिका साकारलीय त्यामुळे त्याचा राग करु की खूप चांगला अभिनय केलाय म्हणून त्याचं कौतुक करु. तुझा खूप अभिमान आहे." अशा शब्दात सखीने प्रतिक्रिया दिली आहे. 'छावा' सिनेमा १४ फेब्रुवारी २०२५ ला रिलीज झालाय. सिनेमाने भारतात आतापर्यंत ३०० कोटींची कमाई केलीय. 'छावा'मध्ये विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारुन खूप कौतुक मिळवलंय.