Join us

"सचिन आणि माझी आधी कधीच मैत्री नव्हती, कारण.."; अशोक सराफ यांनी केला खुलासा

By देवेंद्र जाधव | Updated: July 23, 2025 13:09 IST

सचिन पिळगावकरांशी आधी मैत्री नव्हती असं विधान अशोक सराफ यांनी केलंय. त्यामागचंही कारणही त्यांनी सर्वांना सांगितलाय

सचिन पिळगावकर हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते. सचिन पिळगावकरांना आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. सचिन यांची जोडी अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबत जमली. या दोघांच्या जोडीचे सिनेमे सुपरहिट ठरले. मराठी प्रेक्षक आजही त्यांचे सिनेमे आवडीने पाहतात. अशातच सचिन माझा आधी कधीच मित्र नव्हता, असं विधान अशोकमामांनी एका मुलाखतीत केलं आहे. त्यामागचं कारणही त्यांनी सांगितलंय. जाणून घ्या काय म्हणाले अशोक सराफ?

...म्हणून सचिनची माझी मैत्री नव्हती

रेडियो नशाला दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ यांनी सचिन पिळगावकरांच्या मैत्रीबद्दल सांगितलं की, "मायबाप सिनेमापासून आम्ही एकत्र काम करायला सुरुवात केली. हा सिनेमा सचिनने दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा होता. त्यावेळी मी आणि सचिनने पहिल्यांदा एकत्र काम केलं. सचिनने तब्बल १५ मराठी सिनेमे बनवले. त्या सर्व पिक्चरमध्ये मी आहे. सचिनसोबत माझी आधी कधीच मैत्री नव्हती. त्याच्या वडिलांसोबत माझी मैत्री होती. सचिनचे वडील शरद पिळगावकर हे निर्माते होते. शरदजींनी जे सिनेमे बनवले त्यातही मी काम केलं. त्यामुळे मी शरदजींचा मित्र होतो." 

"मी ऑफिसला कधी शरदजींना भेटायला जायचो तेव्हा सचिन तिकडे यायचा. काय? कसाय? बरा आहे ना, एवढंच आमचं बोलणं व्हायचं. बाकी आम्ही काही बोलायचो नाही.  तो मग निघून जायचा मी पण माझ्या कामाला जायचो. पण जेव्हा एकत्र काम करायला लागतो तेव्हा माझं आणि त्यांचं खूप जमलं.  त्याची जी इच्छा आहे ते मला अभिनयातून कसं द्यायचंय आणि मी जे करु शकतो ते त्याला बघायचंय, ही गोष्ट आमची छान जुळली. त्यामुळे आम्ही इतके चांगले मित्र बनलो की विचारुच नका. आम्ही सलग सिनेमे केले. आणि मराठी सिनेमात त्याने बॅक टू बॅक हिट सिनेमे दिले." 

सचिन - अशोक यांचे सिनेमे

सचिन आणि अशोक या जोडीचे 'अशी ही बनवाबनवी', 'मायबाप', 'आत्मविश्वास', 'गंमत जंमत', 'नवरा माझा नवसाचा', 'आयडियाची कल्पना', 'माझा पती करोडपती', 'नवरी मिळे नवऱ्याला', 'आम्ही सातपुते', 'आमच्यासारखे आम्हीच' हे सिनेमे चांगलेच गाजले. या दोघांचा नुकताच रिलीज झालेला 'नवरा माझा नवसाचा २' हा सिनेमाही सुपरहिट ठरला.

टॅग्स :अशोक सराफसचिन पिळगांवकरमराठी चित्रपटमराठी अभिनेता