अभिनेते दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) यांचा 'दशावतार' चित्रपट (Dashavatar Movie ) सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट १२ सप्टेंबरला प्रदर्शित झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. कोकणातील पार्श्वभूमीवर आधारीत असलेल्या या सिनेमात दिलीप प्रभावळकर यांनी बाबुली मेस्त्रीची भूमिका साकारली आहे. या भूमिकेचं सर्वत्र खूप कौतुक होताना दिसत आहे. दरम्यान, अभिनेत्री रेणुका शहाणे (Renuka Shahane) यांनी 'दशावतार' हा चित्रपट पाहिला आणि पोस्ट शेअर करत हा सिनेमांनी सर्वांनी पाहावा, असं आवाहन केलं.
रेणुका शहाणे यांनी नुकताच दशावतार हा सिनेमा पाहिला आणि त्यांनी या चित्रपटासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर 'दशावतार' चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आणि लिहिले की, ''अजिबात चुकवू नका. प्रेक्षागृहात जाऊन पहा हा अप्रतिम चित्रपट. सुबोध खानोलकर व त्यांच्या संपूर्ण टीमचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. दिलीप प्रभावळकर साष्टांग दंडवत.''
'दशावतार'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन'दशावतार'च्या माध्यमातून प्रेक्षकांना कोकणातील समृद्ध संस्कृती, परंपरा आणि लोककलेचा अप्रतिम संगम पाहायला मिळत आहे. चित्रपटाचे कथानक प्रेक्षकांना खिळवून ठेवत असून, कलाकारांचा दमदार अभिनय प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहे. या सिनेमात दिलीप प्रभावळकर यांच्यासोबत महेश मांजरेकर, भरत जाधव, प्रियदर्शिनी इंदलकर, सिद्धार्थ मेनन, आरती वडगबाळकर, विजय केंकरे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. प्रदर्शनाच्या पहिलत्या तीन दिवसांतच या चित्रपटाने तब्बल ५ कोटी २२ लाख रुपयांचा गल्ला जमवला असून तो प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी झाला आहे.