Join us
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! मराठीत अशा प्रकारची ॲक्शन..., 'राजा शिवाजी'ची झलक पाहून विकी कौशलही प्रभावित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 13:35 IST

'राजा शिवाजी'च्या रिलीजआधी 'छावा' म्हणजेच विकी कौशलने घेतली रितेश देशमुखची भेट

'जिओ स्टुडिओज' आणि 'मुंबई फिल्म कंपनी' प्रस्तुत बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपट ‘राजा शिवाजी’ १ मे रोजी प्रदर्शित होत आहे. त्याआधी एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.पडद्यावर छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारलेला अभिनेता विकी कौशल आणि ‘राजा शिवाजी’मधून छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे रितेश विलासराव देशमुख एकाच फ्रेममध्ये दिसले. ही भेट सिनेप्रेमींसाठी पर्वणीच ठरली आहे. लवकरच रितेश आणि विकी कौशलच्या खास संभाषणाचा पूर्ण व्हिडीओ समोर येणार आहे. तसंच विकी कौशलने 'राजा शिवाजी'ची झलक पाहून काय प्रतिक्रिया दिली वाचा.

‘छावा’ चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमुळे विशेष चर्चेत आलेल्या विकी कौशलने नुकतीच रितेश विलासराव देशमुखची भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये ‘राजा शिवाजी’च्या निर्मितीप्रवासाविषयी, ऐतिहासिक व्यक्तिरेखा पडद्यावर साकारताना येणाऱ्या जबाबदाऱ्या आणि अशा भव्य चित्रपटाच्या निर्मितीमागील मेहनतीबाबत सखोल संवाद रंगला. तसेच विकी कौशल यांनी ‘राजा शिवाजी’च्या संपूर्ण टीमला मनःपूर्वक शुभेच्छा देत, ऐतिहासिक विषयावर इतक्या भव्य स्वरूपात चित्रपट साकारण्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

या चर्चेदरम्यान रितेश विलासराव देशमुख यांनी ‘राजा शिवाजी’साठी अभिनेता, दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता अशा चार वेगवेगळ्या भूमिका कशा सांभाळल्या, याविषयी मनमोकळेपणाने अनुभव शेअर केले. ऐतिहासिक विषयावर काम करताना घेतलेली तयारी, व्यक्तिरेखांच्या मांडणीत ठेवलेली बारकाई, तसेच द्विभाषिक चित्रपटाच्या चित्रीकरणातील आव्हाने आणि अनुभव याबाबत त्यांनी सविस्तर संवाद साधला. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांना एका चित्रपटासाठी एकत्र आणण्यामागील नियोजन आणि या भव्य प्रकल्पाची व्याप्ती याविषयीही त्यांनी अनेक रंजक गोष्टी सांगितल्या. निर्मात्यांकडून या संवादाची केवळ एक झलक प्रेक्षकांसाठी प्रदर्शित करण्यात आली आहे.  यामध्ये विकी कौशलने दिलेली प्रतिक्रिया व्हायरल होत आहे. 'मराठी सिनेमाने कदाचितच अशा प्रकारचा अॅक्शन सीक्वेन्स पाहिला असेल' असं तो म्हणाला. विकी कौशल आणि रितेश विलासराव देशमुख यांच्या या खास भेटीचा संपूर्ण व्हिडिओ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचेही सांगितले जात आहे.

‘राजा शिवाजी’मध्ये हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांची भव्य फळी एकत्र आली आहे. संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि जिनिलिया देशमुख यांसारख्या कलाकारांच्या प्रभावी उपस्थितीमुळे चित्रपटाची भव्यता अधिक वाढली आहे. या संपूर्ण टीमचे नेतृत्व रितेश विलासराव देशमुख करत असून, त्यांनी लेखन, दिग्दर्शन, निर्मिती आणि मुख्य भूमिका अशा सर्वच जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या आहेत.

'जिओ स्टुडिओज'द्वारे सादर करण्यात आलेला आणि 'मुंबई फिल्म कंपनी'ची निर्मिती असलेला ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट ज्योती देशपांडे आणि जिनिलिया देशमुख यांनी निर्मित केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन, संघर्ष, नेतृत्व आणि स्वराज्य स्थापनेचा प्रेरणादायी प्रवास यावर आधारित हा ऐतिहासिक महाचित्रपट भारताच्या गौरवशाली इतिहासाला भव्य सिनेमॅटिक रूप देण्यास सज्ज आहे.

‘राजा शिवाजी’ हा चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. भव्य दृश्यरचना, दमदार कथा, ऐतिहासिक भावविश्व आणि प्रेरणादायी मांडणीमुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक संस्मरणीय अनुभव ठरणार असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Vicky Kaushal Impressed by Glimpse of Riteish Deshmukh's 'Raja Shivaji'

Web Summary : Vicky Kaushal praised Riteish Deshmukh's 'Raja Shivaji', calling its action sequences unprecedented in Marathi cinema. The film, releasing May 1, 2026, stars a stellar cast and is directed by Riteish Deshmukh, who also plays the lead. It promises a grand cinematic experience.
टॅग्स :रितेश देशमुखविकी कौशलराजा शिवाजी चित्रपटबॉलिवूड