Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मी नक्की येणार..."; 'पुष्पा' फेम अभिनेता फहाद फासिलने 'शंकर जयकिशन' नाटकाला दिल्या शुभेच्छा, कलाकारांना आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 12:10 IST

‘शंकर जयकिशन’ नाटकाची तालीम सध्या हैद्राबादला सुरु आहे. यावेळी सर्व कलाकारांना भेटण्यासाठी साऊथ सुपरस्टार फहाद फासिलने हजेरी लावली होती

मराठी रंगभूमीवर लवकरच दाखल होणाऱ्या सुरज पारसनीस दिग्दर्शित ‘शंकर जयकिशन’ या नाटकाच्या तालमीबद्दल एक अनोखी गोष्ट समोर आली आहे. साधारणत: नाटकांच्या तालमी या मुंबई–पुण्यात किंवा कलाकारांच्या उपलब्धतेनुसार महाराष्ट्रातच होतात. परंतु नाटकाची तालीम थेट हैदराबादला होतेय. हे ऐकून नाटकप्रेमींसुद्धा आश्चर्यचकित झाले आहेत. विशेष म्हणजे या तालमीसाठी साउथचा मोठा सुपरस्टार सहभागी झाला होता. हा अभिनेता म्हणजे फहाद फासिल.फहादची विशेष उपस्थिती, कारण...

‘शंकर जयकिशन’ नाटकाची तालीम हैद्राबादला ठेवण्याच्या अनोख्या निर्णयामागे कारणही तितकेच विशेष आहे. नाटकातील मुख्य भूमिका साकारत असलेले महेश मांजरेकर सध्या एका महत्त्वाच्या दाक्षिणात्य चित्रपटाचे चित्रीकरण हैदराबादमध्ये करत आहेत. चित्रपटाचे शूटिंग आणि नाटकाची तालीम या दोन्ही गोष्टी एकत्र सांभाळताना नाटकावर परिणाम व्हायला नको,या विचारातून हा निर्णय घेण्यात आला आहे.

महेश मांजरेकर यांनी या संदर्भात नाटकाचे अभिनेते व निर्माते भरत जाधव यांच्याशी चर्चा केली. नाटकाची गुणवत्ता अबाधित राहावी, तालीम सुरळीत व्हावी यासाठी भरत जाधव यांनी तात्काळ तयारी दाखवत, संपूर्ण टीमसह हैदराबादला तालीम करण्यास होण्यास होकार दिला. त्यामुळे आता नाटकाची टीम काही दिवसांपासून हैदराबादमध्येच मुक्काम करत आहे आणि तिथे अगदी जोरदार व शिस्तबद्ध तालीम सुरू असून ही तालीम सेटवर आणि व्हॅनिटी व्हॅनमध्ये होत आहे.

वैशिष्ट्य म्हणजे  मल्याळम चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रभावी आणि दमदार परफॉर्मन्ससाठी ओळखला जाणारा 'पुष्पा' फेम लोकप्रिय अभिनेता फहाद फासील याने तालमीदरम्यान टीमला भेटून गप्पा मारत नाटकाला शुभेच्छा दिल्या. एका नाटकासाठी इतक्या प्रमाणात केलेला हा लॉजिस्टिक प्रयत्न मराठी रंगभूमीत क्वचितच पाहायला मिळतो.

महेश मांजरेकर सध्या अक्षरशः डबलशिफ्ट मध्ये काम करत असून दिवसा दाक्षिणात्य चित्रपटाचे शूटिंग आणि संध्याकाळपासून ‘शंकर जयकिशन’ नाटकाची तालीम चालू आहे. त्यांच्या काम करण्याच्या वेगाने आणि समर्पणाने संपूर्ण टीमलाच नवसंजीवनी मिळाली आहे. नाटकासाठी ते दाखवत असलेलं प्रेम खरोखरच उल्लेखनीय आहे. एका मुलाखतीत महेश मांजरेकर म्हणाले होते “नाटक हे माझं पहिलं प्रेम आहे.'' आज हैदराबादमध्ये चालू असलेल्या या तालमींमुळे तो शब्द त्यांनी कृतीतून सिद्ध केला आहे.

त्यांचा डेडिकेशन पाहून तिथे उपस्थित टीमलादेखील प्रचंड प्रेरणा मिळत असल्याचं समजतं. भरत जाधव यांच्यासह संपूर्ण तांत्रिक आणि कलात्मक मंडळींच्या सहकार्यामुळे नाटक अधिक दमदार व्हावं, यासाठी सर्वजण मनापासून प्रयत्न करत आहेत. तालीम हैदराबादला हलवण्याचा हा निर्णय नाटकाविषयी टीमचा असलेला जिव्हाळा आणि व्यावसायिकता दाखवतो. मराठी नाटकांमध्ये आजवर क्वचितच पाहिल्या गेलेल्या अशा पद्धतीच्या तालमींमुळे प्रेक्षकांच्या उत्सुकतेत आणखी भर पडली आहे.

भरत जाधव एण्टरटेन्मेंट निर्मित सुरज पारसनीस दिग्दर्शित या नाटकाचे लेखन विराजस कुलकर्णी याने केले आहे. क्षितिज पटवर्धन यांचे गीत आणि अजित परब यांचे संगीत लाभलेल्या या नाटकात शिवानी रांगोळे, भरत जाधव आणि महेश मांजरेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विनोद, भावना आणि नात्यांचे सुंदर मिश्रण असलेल्या ‘शंकर-जयकिशन’ या नाटकाचा शुभारंभ १९ डिसेंबर रोजी विलेपार्ले येथील दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Fahadh Faasil wishes 'Shankar Jaikishan' team; rehearsals in Hyderabad!

Web Summary : The play 'Shankar Jaikishan' rehearsed in Hyderabad due to Mahesh Manjrekar's filming schedule. Fahadh Faasil visited the team, offering his best wishes. The play premieres December 19th.
टॅग्स :भरत जाधवमहेश मांजरेकर शिवानी रांगोळेटेलिव्हिजनमराठी अभिनेताTollywood