Join us

धक्कादायक! बिबट्याच्या हल्ल्यात १३ वर्षीय मुलाचा मृत्यू; हेमंत ढोमे संतापला, म्हणाला-"जंगल संपवणाऱ्यांमुळे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 11:10 IST

"आता सहनशक्तीचा अंत होणार, लोक …",हेमंत ढोमेची संतप्त पोस्ट, गावात बिबट्याच्या हल्ल्यात १३ वर्षीय मुलाचा मृत्यू 

Hemant Dhome Post: शिरूर तालुक्यातील बेट भागात बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. गेल्या १५ दिवसांमध्ये दोन लहान मुलांसह एका जेष्ठ महिलेचा मृत्यू झाला असून त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यात आता बिबट्याच्या हल्ल्यात आणखी एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे रविवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास घडली. रोहन बोंबे असं या चिमुकल्याचं नाव आहे.दरम्यान, वन विभाग सातत्याने प्रयत्न करत असूनही या परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार कायम आहे. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. अशातच या प्रकरणी मराठी अभिनेता,दिग्दर्शक हेमंत ढोमेने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत यावर ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे. 

नुकतीच हेमंत ढोमेने त्याच्या अधिकृत एक्स अकाउंटवर पोस्ट शेअर करत त्याची तळमळ व्यक्त केली आहे. तसंच त्याने या पोस्टद्वारे बिबिट्याच्या पावलांचे ठसे असलेले फोटो देखील दाखवले आहेत. या पोस्टमध्ये अभिनेत्याने लिहिलंय की, "पुन्हा एक हल्ला आणि अजून एक चिमूरडा मृत्युमुखी… माझ्या पिंपरखेड गावात अजून एक बळी गेला… लहानगा रोहन बोंबे बिबट्याच्या हल्ल्यात दगावला…सरकारकडे पुन्हा एकदा मागणी आहे की लवकरात लवकर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात…आज जमावाने कायदा हातात घेतला आहे, गेल्या काही दिवसात माझ्या भागात ११ मृत्यू झाले आहेत… चित्र खूप भयानक आहे… प्रचंड भीती आहे… पशूधनाची तर यात मोजणी सुद्धा झालेली नाही.आधीच अस्मानी संकटाने कंबरडं मोडलंय त्यात हे जंगली संकट!"

यानंतर हेमंतने म्हटलंय,"आता सहनशक्तीचा अंत होणार, लोक कायदा हातात घेणार यापेक्षा human-wildlife conflict वर sustainable उपाययोजना आणि कायदे आखण्यात यावेत… जनजागृती व्हावी… मागेच जवळपास २० वर्षांपूर्वी याबाबतीत विद्या अथ्रेया यांनी प्रचंड काम केलं आहे त्याकडेही डोळेझाक झाली आहे… आपण जंगलात घुसलो आहोत हे बरोबर आहे पण जंगलापासून दूर राहणाऱ्या शेतकऱ्यांना याचा त्रास भोगावा लागत आहे… जंगल संपवणाऱ्यांमुळे वर्षानुवर्षे शेती करणाऱ्या भुमीमालकांचं जगणं कठीण झालंय.हे आहेत माझ्याच शेतातले आजचे ताजे ठसे… एक अमोल कोल्हे सोडल्यास आमचे बाकीचे लोकप्रतिनिधी मात्र कशात मशगुल आहेत कोणास ठाऊक???". अशी संतापजनक पोस्ट अभिनेत्याने शेअर केली आहे. 

नेमकं काय घडलं?

पुण्यातील पिंपरखेड येथील आंबेवाडी परिसरात विलास बोंबे यांचे घर असून, आजूबाजूला उसाचे क्षेत्र आहे. रविवारी दुपारच्या सुमारास रोहन घरासमोरील शेतात शौचासाठी गेलेला होता. त्या वेळी बिबट्याने त्याच्यावर हल्ला करून त्याला ओढून उसाच्या शेतात नेले. बिबट्यावे रोहनच्या मानेला चावा घेतला. यात रोहनचा जागीच मृत्यू झाला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard attack kills boy, actor Hemant Dhome expresses outrage.

Web Summary : A 13-year-old boy was killed in a leopard attack in Shirur. Actor Hemant Dhome expressed outrage, demanding action. The boy, Rohan Bombe, was attacked near his home. Dhome highlighted the increasing human-wildlife conflict and government inaction.
टॅग्स :Hemant Dhome Today Newsपुणेबिबट्यासोशल मीडिया