'जत्रा' सिनेमात प्रिया बेर्डे यांनी सरपंच बाईची भूमिका साकारली होती. लक्ष्मीकांत बेर्डे गेल्यावर अशा पद्धतीची भूमिका साकारणं हे प्रिया बेर्डेंना नक्कीच आव्हानात्मक होतं. त्यावेळी त्यांच्या मनाची अवस्था कशी होती, हे त्यांनी लोकमत फिल्मीशी बोलताना सांगितलं. प्रिया म्हणाल्या, '''कमबॅक करणं मला आवश्यक होतं. पुन्हा मी तशा भूमिका करु शकत नव्हते. हिरोच्या बरोबर डान्स, गाणं वगैरे करणं शक्यच नव्हतं.''
''त्या वयाला अनुसरुन जी भूमिका मला केदारने ऑफर केली तेव्हा माझ्या डोक्यात असं आलंच नाही, आता लक्ष्मीकांत गेलेत आणि त्याने मला अशा पद्धतीचा रोल विचारला आहे. केदारने मला एवढंच सांगितलेलं की, यात नाच वगैरे काही नाहीये. इथे सरपंच बाई म्हणून खूप तडफदार भूमिका आहे. त्याच्यावरच मी त्याला हो म्हटलं. माझ्या डोक्यात हा विचारच आला नाही की, अशा पद्धतीची भूमिका आहे. ती करावी की नाही करावी.''
''आणि कसंय, पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ हे संपूर्ण वेगळं असतं. त्यावेळेला मला कामाची गरज होती. त्यामुळे अगदी आनंदाने मी ती भूमिका स्वीकारली. भरत बरोबर काम करायचं होतं, क्रांती मला माहिती होती, सिद्धू माहिती होता. एवढी छान टीम आहे.''
''केदार आणि मी दोघेही बालपणीचे मित्र आहोत. आम्ही दोघं एकमेकांना लहानपणापासून ओळखतो. केदारने ज्या पद्धतीने अगं बाई अरेच्चा केलं होतं. इतकी सारी नाटकं केली होती. माझ्याबरोबरीच्या मुलांसोबत काम करणं हे त्यावेळी माझ्यासाठी खूप गरजेचं होतं. त्यामुळे ती भूमिका मी स्वीकारली. त्यामुळे आता लक्ष्मीकांत गेलेत आणि योगायोगाने अशी भूमिका मिळतेय, हे त्यावेळी माझ्या डोक्यातच नव्हतं. पण मी ही भूमिका खूप एन्जॉय केली. मला हा ग्रुप खूप आवडला. खूप मजा केली.''