Join us

प्रिया बापटच्या 'सिटी ऑफ ड्रिम्स २'चा ट्रेलर रिलीज, बाप-लेक राजकीय रिंगणात येणार आमने-सामने

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 16:31 IST

अभिनेत्री प्रिया बापटची गाजलेली वेबसीरिज सिटी ऑफ ड्रिम्सचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापटची गाजलेली वेबसीरिज सिटी ऑफ ड्रिम्सचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  एकामागून एक येणारे ट्विस्ट, दमदार अभिनय आणि राजकीय नाट्यामुळे पहिला सीझन तुफान लोकप्रिय झाला होता. त्यानंतर प्रेक्षका दुसऱ्या सीझनची उत्सुकतेने वाट पाहत होते. नुकताच दुसऱ्या सीझनचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. 

सिटी ऑफ ड्रिम्सच्या पहिल्या भागात भाऊ आणि बहिणीमध्ये राजकीय रिंगणात कोण उतारणार, यावरून वाद सुरू होते. मात्र दुसऱ्या सीझनमध्ये लेक आणि वडिलांमध्ये राजकारणाचा खेळ कसा रंगतो? हे दाखवण्यात येणार आहे. खुर्चीच्या लालसेपुढे सर्व नात्यांना अर्थ नसतो. एखादा राजकारणी सत्ता मिळवण्यासाठी किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो आणि त्याची मुलगी देखील त्याला कशी जोरदार टक्कर देते हे या सीरिजमध्ये दाखवले जाणार आहे. 

‘सीरिज सिटी ऑफ ड्रीम्स’च्या पहिल्या सीझनच्या शेवटी, या राजकीय पार्टीची भव्य बैठक पहिली होती. जगदीश दिल्लीसाठी योजना आखतो आणि त्याचा मार्ग मोकळा करून घेतो. दरम्यान, पौर्णिमाला हल्ल्याबद्दल माहिती मिळते. त्यामुळे पहिल्या सीझनमध्ये शिल्लक राहिलेली ही कहाणी सीझन २ मध्येही सुरू राहील. 

सिटी ऑफ ड्रिम्स २ सीरिजमध्ये प्रिया बापटसोबतच सचिन पिळगांवकर, सिद्धार्थ चांदेकर, अतुल कुलकर्णी, देवस दीक्षित, विकास केणी, संदीप कुलकर्णी असे अनेक मराठी कलाकार दिसणार आहेत. याशिवाय एजाज खान आणि सुशांत सिंग हे कलाकार यात झळकणार आहेत. सिटी ऑफ ड्रिम्स २ सीरिज ३० जुलैला हॉटस्टारवर पहायला मिळणार आहे.

टॅग्स :प्रिया बापटअतुल कुलकर्णीसिद्धार्थ चांदेकरसचिन पिळगांवकरसुशांत सिंग