Join us

"लाडू, मोदक, सुरळीच्या वड्या...", प्रिया बापट आहे सुगरण; नवीन घरात साजरा केला गणेशोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 16:30 IST

प्रिया बापटने शेअर केली गोड पोस्ट

मराठी कलाविश्वातील लाडकी जोडी उमेश कामत आणि प्रिया बापट  (Priya Bapat) काही दिवसांपूर्वीच नवीन घरात शिफ्ट झाले. दोघांनी यंदा मुंबईतील या नव्या घरात बाप्पाचं स्वागत केलं. त्यांच्याकडे ७ दिवसांसाठी बाप्पा विराजमान झाले आणि आज उमेश-प्रियाने गणपती विसर्जन केलं. हे सात दिवस किती छान गेले याची झलक प्रियाने सोशल मीडियावर दाखवली आहे. विशेष म्हणजे प्रियाने स्वत:च्या हाताने नैवेद्य, गोड पदार्थ आणि संपूर्ण स्वयंपाक केला होता. 

प्रिया बापटने इन्स्टाग्रामवर अनेक फोटो, व्हिडिओ शेअर केले होते. पहिल्या फोटोत तिने बेसनाचे लाडू केलेले दिसत आहे. ते दाखवत तिने सेल्फी काढला आहे. नवीन घराची झलक दाखवली आहे. बाप्पाच्या मूर्तीचाही फोटो आहे. प्रिया अभिनेत्रीसोबतच सुगरणही आहे. तिने स्वत:च्या हाताने मोदक बनवले. साडी नेसून मोदक बनवतानाचा फोटो तिने पोस्ट केला आहे. यानंतर सुरळीच्या वड्या पाडतानाचा व्हिडिओ दाखवला आहे. गणपती आरतीचा व्हिडिओ शेअर केला आहे. नैवेद्याचं ताट दाखवलं आहे.

यासोबत प्रियाने कॅप्शन देत लिहिले, "नवीन घरात पहिल्यांदाच गणेशोत्सव साजरा केला. आमच्या आनंदात अनेक मित्रमंडळी, कुटुंबिय सामील झाले. मी बनवलेलं स्वादिष्ट जेवण केलं. खूप गप्पा मारल्या आणि इतकं हसलो की आता माझा आवाजही गेला आहे. आम्ही सगळ्यांचं आदरातिथ्य करण्यात इतके व्यग्र झालो की माझ्या 'गणु'सोबत आणि अगदी मित्रपरिवारासोबत एकही फोटो काढला नाही. पण आम्ही असंख्य आठवणी बनवल्या ज्या कायम स्मरणात राहतील. आज बाप्पाला निरोप द्यायची वेळ आली आहे. हे ७ दिवस खूप सुंदर होते. आभार व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दही नाहीत."

उमेश आणि प्रिया अनेक वर्षांनी एकत्र मराठी सिनेमात दिसणार आहेत. त्यांचा 'बिन लग्नाची गोष्ट' हा सिनेमा १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :प्रिया बापटउमेश कामतसेलिब्रिटी गणेशगणेशोत्सव