Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोऱ्या कागदाची कविता अन् जशी व्हावी..; सतीश राजवाडेंच्या 'प्रेमाची गोष्ट २'ची घोषणा, 'हा' अभिनेता रोमँटिक भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 13:29 IST

अतुल कुलकर्णी आणि सागरिका घाटगे यांच्या गाजलेल्या प्रेमाची गोष्ट सिनेमाचा सीक्वल येतोय. दुसऱ्या भागात नवी स्टारकास्ट दिसणार आहे

२०१३ साली रिलीज झालेल्या 'प्रेमाची गोष्ट' सिनेमाचं रोमँटिक सिनेमे आवडणाऱ्या प्रेक्षकांच्या मनात वेगळंच स्थान आहे. अतुल कुलकर्णी आणि सागरिका घाटगे या कलाकारांनी या सिनेमात प्रमुख भूमिका साकारली होती. आता याच सिनेमाचा सीक्वल अर्थात 'प्रेमाची गोष्ट २'ची घोषणा आज मकरसंक्रांतीच्या मुहुर्तावर करण्यात आली. 'प्रेमाची गोष्ट २' मध्ये नवी स्टारकास्ट दिसत असून सिनेमाच्या रिलीज डेटचीही घोषणा करण्यात आलीय. 

 'प्रेमाची गोष्ट २'ची घोषणा

प्रेमाचे नशीब, नशीबातील प्रेम बदलणारी एक नवीन गोष्ट ‘प्रेमाची गोष्ट २’ मध्ये पाहायला मिळणार आहे. प्रेम कधी-कधी नशिबाशी खेळतं आणि कधी नशीब प्रेमाला नव्या वाटेवर घेऊन जातं, या संकल्पनेवर आधारित ही प्रेमकथा आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना नात्यांचा रंजक प्रवास पाहायला मिळेल. ‘मुंबई-पुणे-मुंबई’, ‘मुंबई-पुणे-मुंबई २’, ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’, ‘प्रेमाची गोष्ट’, आणि ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटांतून प्रेमाच्या अनेक छटा दाखवणारे दिग्दर्शक सतीश राजवाडे आता ‘प्रेमाची गोष्ट २’ हा चित्रपट घेऊन येत आहेत. अभिनेता ललित प्रभाकर सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

कधी रिलीज होणार 'प्रेमाची गोष्ट २'?

एव्हरेस्ट एंटरटेनमेंट सादर करत असलेल्या ‘प्रेमाची गोष्ट २’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले असून निर्माते संजय छाब्रिया आहेत तर सह निर्माते अमित भानुशाली आहेत. सतीश राजवाडे आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट यांनी नेहमीच प्रेक्षकांना पैसा वसूल करणारे चित्रपट दिले आहेत. त्यामुळे हा चित्रपटही प्रेक्षकांसाठी एक खास भेट ठरणार आहे. येत्या जून २०२५ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल.

टॅग्स :सतिश राजवाडेललित प्रभाकरमराठी चित्रपट