Join us

प्रवीण तरडेंनी स्वामी समर्थांना लिहिलं पत्र, म्हणाले- "१० वर्षांपूर्वी 'देऊळ बंद' सिनेमा केला तेव्हा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 13:49 IST

'मुक्काम पोस्ट देवाचं घर' सिनेमाच्या निमित्ताने अनेक सेलिब्रिटी पत्रातून त्यांच्या भावना व्यक्त करत आहे. मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनीदेखील स्वामी समर्थांना पत्र लिहिलं आहे. 

'मुक्काम पोस्ट देवाचं घर' या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. आपण पाठवलेलं पत्र अमेरिकेला पोहोचतं, तर देवाच्या घरी नक्की पोहोचेल असं वाटणाऱ्या एका लहान निरागस मुलीचा देवाच्या घराचा शोध 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' या चित्रपटातून उलगडणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने अनेक सेलिब्रिटी पत्रातून त्यांच्या भावना व्यक्त करत आहे. मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनीदेखील स्वामी समर्थांना पत्र लिहिलं आहे. 

प्रवीण तरडेंचं स्वामी समर्थांना पत्र! 

श्री स्वामी समर्थ, 

प्रिय स्वामी महाराज...साष्टांग नमस्कार विनंती विशेष, पत्रास कारण की, 

खरं तर खूप दिवसांनी पत्र लिहितोय आणि त्याचं खास कारण आहे. मी आज 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' या सिनेमाचा खास शो पाहिला. खूप दिवसांनी सिनेमा पाहताना रडलो. का रडलो माहीत नाही. महाराज, तो चित्रपट पाहताना क्षणाक्षणाला तुमची आठवण येत होती. या चित्रपटातील एक चिमुकली देवाला पत्र लिहित असते. 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' असा पत्ता टाकते. आणि तिचं ते पत्र त्या देवाच्या घरी पोहोचण्यासाठी आणि त्या पत्त्यावर जाण्यासाठी ती आतोनात प्रयत्न करते. ज्या ज्या वेळी तिने पत्र लिहायला घेतलं, त्या त्या वेळी ते तुमच्यापर्यंत पोहोचलं असणारच. 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' हा पत्ता नाही तर हे ब्रह्मवाक्य आहे. त्यामुळे महाराज माझी विनंती आहे की ३१ जानेवारीला प्रदर्शित होणारा हा सिनेमा तुम्हीही पाहा. १० वर्षांपूर्वी मी देऊळ बंद सिनेमा केला होता. आज १० वर्षांनी महाराज मी त्याचा पुढचा भाग बनवतोय. पण, त्याआधी महाराज 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' हा सिनेमा पाहा. तोपर्यंत मी देऊळ बंदचा दुसरा भाग बनवायला घेतो.

तुमचाच,प्रवीण विठ्ठल तरडे

'मुक्काम पोस्ट देवाचं घर' या चित्रपटात ग्रामीण भागातली गोष्ट मांडण्यात आली आहे. सैन्यात असलेले वडील देवाघरी गेले असं आईनं मुलीला सांगितल्यावर देवाचं म्हणजे काय ? आणि ते कुठे असतं? याचा शोध सुरू होतो. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन संकेत माने यांचे आहे. या चित्रपटात मायरा वायकूळ, मंगेश देसाई, कल्याणी मुळे, प्रथमेश परब, रेशम श्रीवर्धन, सविता मालपेकर, उषा नाडकर्णी, माधवी जुवेकर, कमलेश सावंत, स्पृहा परब, रुक्मिणी सुतार  यांच्या मध्यवर्ती भूमिका असून अभिनेत्री पूजा सावंत ही पाहूण्या कलाकारच्या भूमिकेतून आपल्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट येत्या ३१ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

टॅग्स :प्रवीण तरडेमराठी अभिनेतासिनेमा